टीम इंडियाला इंदूरमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाचा धोका आहे. भारताला इंदूरमध्ये पराभवाच्या गर्तेत ढकलण्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार आणि अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायन याचा मोठा वाटा राहिला. नॅथनने दुसऱ्या डावात 8 विकेट्स घेत टीम इंडियाला सुरुंग लावला. नॅथनने यासह मोठा रेकॉर्ड ब्रेक केला.
लायन इंदूर कसोटीतील पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 8 अशाप्रकारे एकूण 11 विकेट्स घेतल्या. लायन यासह बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
लायनच्या नावावर आता 25 टेस्टमध्ये 113 विकेट्सची नोंद झाली आहे. नॅथनने टीम इंडियाचा दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळे याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. कुंबळेच्या नावावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीत निवृत्तीच्या वेळेस 2008 साली 111 विकेट्ससह विक्रम केला होता. सध्या नॅथननंतर आर अश्विनच्या नावावर बीजीटीमध्ये 106 विकेट्सची नोंद आहे.
लायनने दुसऱ्या डावात 64 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स घेतल्या. लायनची त्याच्या कसोटी कारकीर्दीतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. लायनने 2017 मध्ये टीम इंडिया विरुद्ध बंगळुरुत 50 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स पटकावल्या होत्या.
लायनने या सीरिजमध्ये आतापर्यंत 5 डावात 19 विकेट्स घेतल्या आहेत. नॅथनने 2 डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेत सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत टीम इंडियाचा रविंद्र जडेजा आघाडीवर आहे. जडेजाने 5 डावात 21 विकेट्स घेतल्या आहेत.