आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या 23 व्या सामन्यात भारत आणि बांगलादेश आमनेसामने येणार आहेत. हा सामना हॅमिल्टन येथे होणार आहे. प्रश्न उपांत्य फेरीचा असल्याने दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून हा सामना महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात कोणाचं पारडं जड आहे हे जाणून घेण्यासाठी फक्त 4 सामन्यांची स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात आलेले हे चार एकदिवसीय सामने आहेत. या सर्व सामन्यांचा निकाल एकतर्फी लागला आहे. यातल्या प्रत्येक सामन्यात भारताने बांगलादेशला चिरडलं आहे. म्हणजेच भारताने 100% सामने जिंकले आहेत.
आयसीसी महिला विश्वचषकाच्या मैदानात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. तसेच हे दोन्ही संघ यापूर्वी 2017 च्या सुरुवातीला भिडले होते. म्हणजेच 5 वर्षांनंतर भारत आणि बांगलादेश एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत.
आयसीसी महिला विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशकडे आतापर्यंत केवळ 4 सामने खेळण्याचा अनुभव आहे. यामध्ये त्यांनी एक सामना जिंकला असून तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्याच वेळी, भारताने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 68 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 36 जिंकले आहेत. भारतीय संघाकडे दांडगा अनुभव आहे, त्यामुळे हा फरक मैदानात पाहायला मिळेल.