मोहम्मद सिराज याने आशिया कप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एकाच षटकात 4 गडी बाद केले तसेच कमी धावा देऊन पाच बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराजने पथुम निसांकाची विकेट घेतली. दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर सदीरा समरविक्रमाला पायचीत केले. चौथ्या चेंडूवर चरिथ असलंकाला बाद केले. पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर धनंजया डिसिल्वाला कीपरकरवी झेलबाद केले.
एकाच षटकात चार बळी घेणाऱ्या सिराजने सहाव्या षटकातील चौथ्या चेंडूवर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला क्लीन बोल्ड केले. यासह त्याने फक्त 4 धावा देत 5 बळी घेण्याचा विक्रम नोंदवला.
सर्वात कमी चेंडूत 5 बळी घेणारा जगातील दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अशीच कामगिरी श्रीलंकेच्या चामिंडा वास याने केली होती.
2003 मध्ये श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा याने बांगलादेशविरुद्ध केवळ 16 चेंडूत 5 विकेट घेतल्या होत्या. आता सिराजने या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. मोहम्मद सिराजने अवघ्या 16 चेंडूत 5 विकेट घेत विश्वविक्रमही केला आहे. टीम इंडियासाठी सर्वात वेगवान 5 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
सात षटके टाकणाऱ्या मोहम्मद सिराजने केवळ 21 धावा दिल्या आणि 6 बळी घेतले. सिराजच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेचं काही एक चाललं नाही. श्रीलंकेला 50 धावा करता आल्या. हे लक्ष्य भारताने 10 गडी राखून गाठलं.