भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. मात्र या सामन्याआधी बीसीसीआयच्या निर्णयाने टीम इंडियाला धक्का बसला आहे.
भारताने वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका 1-0 ने जिंकली. या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी केली होती. त्यासाठी त्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. मात्र आता त्याला एकदिवसीय मालिकेतून वगळण्यात आलं आहे.
मोहम्मद सिराजला वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. आर अश्विन, अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि नवदीप सैनी यांच्यासह आता मोहम्मद सिराज भारतात परतणार आहे.
मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजही संघात नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची धुरा अष्टपैलू हार्दिक पांड्या, जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकुर, मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांच्या खांद्यावर असणार आहे.
ईएसपीएनक्रिकइंफोच्या बातमीनुसार, कामाचा ताण पाहता बीसीसीआयने सिराजला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या ऐवजी वेस्ट इंडिजला कोणता खेळाडू जाणार याबाबत घोषणा झालेली नाही.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत सिराजची निवड झाली नव्हती. मात्र, तो एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली होती. सामना सुरू होण्याआधी बीसीसीआयने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सिराजने भारताकडून शेवटची वनडे मार्च 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. गेल्या 2 वर्षात सिराजने 23 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4.57 च्या सर्वोत्तम सरासरीने 41 विकेट घेतल्या आहेत. या 41 पैकी 31 विकेट्स यावर्षी घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत सिराजकडे संघाच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी आहे. दुसरीकडे, एकदिवसीय विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे वेळापत्रक व्यस्त आहे. भारताला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आशिया कप खेळायचा आहे. यानंतर विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे.