मुंबईला वानखेडे स्टेडियमवर शनिवारी 22 एप्रिल रोजी घरच्या मैदानात पंजाबकडून 13 धावांनी पराभव स्विकारावा लागला. मात्र या सामन्यात अनेक रेकॉर्ड झाले.
पंजाब किंग्सने पहिले बॅटिंग करताना शेवटच्या 6 ओव्हरमध्ये 109 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हा अखेरच्या 6 ओव्हरमधील दुसरी सर्वाधिक धावसंख्या ठरली. याआधी आरसीबीने गुजरात विरुद्ध 2016 मध्ये 126 धावा केल्या होत्या.
अर्जुन तेंडुलकर पंजाबच्या डावातील 16 वी ओव्हर टाकताना 31 धावा दिल्या. अर्जुन यासह एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा देणारा मुंबईचा दुसरा गोलंदाज ठरला. याआधी 2022 मध्ये डॅनियल सॅम्स याने केकेआर विरुद्ध 35 धावा दिल्या होत्या.
अर्शदीपने या सामन्यात पंजाबकडून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याने यासह आरसीबीच्या मोहम्मद सिराज याच्याकडून पर्पल कॅप हिसकावली. तसेच आयपीएलमध्ये विकेट्सचं अर्धशतकही पूर्ण केलं.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने पंजाब विरुद्ध 215 धावांचा पाठलाग करताना 44 धावांची खेळी केली. रोहितने यामध्ये 3 सिक्स ठोकले. रोहित यासह आयपीएलमध्ये 250 सिक्स ठोकणारा पहिला भारतीय आणि एकूण तिसरा फलंदाज ठरला. याआधी एबी डी व्हीलियर्स आणि ख्रिस गेल या दोघांनीच असा कारनामा केला होता.
तसेच पंजाबने चौथ्यांदा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी बचाव केला. आतापर्यंत चेन्नईने सर्वाधिक 6 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा बचाव केला आहे.