इशान किशन आपल्या आडमुठ्या भूमिकेमुळे स्वत:च्याच जाळ्यात अडकत चालला आहे असं दिसत आहे. नॅशनल क्रिकेटमध्ये टीममध्ये संधी मिळवण्यासाठी अनेक खेळाडू धडपड करत आहेत. तर इशानला संधी मिळूनही त्याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे क्रीडाक्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यात इशान किशन टीम इंडियाचा भाग होता. पण त्याने स्पर्धेतून माघार घेतली. तसेच फीट असूनही रणजी ट्रॉफीत खेळला नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्याला सेंट्रल काँट्रॅक्ट लिस्टमधून बाहेर फेकलं आहे. क श्रेणीत असलेल्या इशान किशनला वार्षिक 1 कोटी रुपये मिळत होते.
आता इशान किशन पुन्हा एकदा बीसीसीआयच्या रडारवर आला आहे. इशान किशनने पुन्हा एकदा अक्षम्य अशी चूक केली आहे. त्यामुळे बीसीसीआय त्याच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. इशान किशन मुंबईत होणाऱ्या डीवाय पाटील टी20 स्पर्धेतून क्रिकेटमध्ये परतला आहे
या स्पर्धेत इशान किशन हा रिलायन्स 1 संघाकडून खेळत आहे. इशान किशनने या स्पर्धेत बीसीसीआयच्या एका प्रमुख नियमाकडेही दुर्लक्ष केले असून त्याला शिक्षा होऊ शकते.
पहिल्या सामन्यात जेव्हा इशान किशन फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्याच्या फलंदाजीपेक्षा त्याच्या हेल्मेटनेच अधिक लक्ष वेधले. वास्तविक, इशानच्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो होता आणि इथेच त्याने एक मोठा नियम मोडला.
बीसीसीआयने खेळाडूंसाठी एक कठोर नियम बनवला आहे की देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळाडूंना हेल्मेट, जर्सी किंवा कोणत्याही उपकरणावर बीसीसीआयचा लोगो वापरता येणार नाही.
टीम इंडियाकडून खेळणारे खेळाडू अनेकदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपापल्या संघाकडून खेळताना याचा वापर करतात. मात्र, काही वर्षांपूर्वी बीसीसीआयने या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते.