पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत काही विचित्र घटना घडल्या. तसेच काही वादही उफाळून आले. खासकरून विनेश फोगाट अपात्र प्रकरण चांगलंच गाजलं. असं असताना पॅरिस खेळगावातून स्पर्धेक आता मायदेशी परतत आहेत. तसेच पुढच्या स्पर्धेची तयारीसाठी आतापासूनच सज्ज झाले आहेत.
ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचे वेध आतापासूनच लागले आहेत. कारण स्पर्धकांना इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी इतका अवधी लागतो. ऑलिम्पिकचं पुढचं 34वं पर्व असणार आहे. अमेरिकेच्या लॉस अँजेलिस या शहरात या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे.
पुढची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी खास असणार आहे. या स्पर्धेत भारताचं एक पदक निश्चित मानलं जात आहे. कारण या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे क्रीडारसिकांना ऑलिम्पिक स्पर्धेत इतर खेळांसोबत क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे.
ऑलिम्पिकच्या 35 व्या पर्वाचं यजमानपदही निश्चित झालं आहे. अमेरिकेनंतर पुढची ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये 2032 स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. दुसरीकडे, 2036 स्पर्धेसाठीचं यजमान निश्चित नाही.
ऑलिम्पिक 2036 स्पर्धेचं यजमानपद मिळवण्यासाठी इजिप्तने पुढाकार घेतला आहे. यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरु आहेत. 2036 किंवा 2040 स्पर्धेचं यजमानपद मिळावं यासाठी बोलणी सुरु आहेत.
दुसरीकडे, ऑलिम्पिकचं एकही पर्व अफ्रिकेत झालेलं नाही. त्यामुळे 2040 स्पर्धेचं यजमानपद अफ्रिकेला देण्याचा खटाटोप सुरु आहे. एका रिपोर्टनुसार, तयारी आणि एकंदरीत गणित पाहता 2040 ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद अफ्रिकेला मिळण्याची शक्यता आहे.