LLC 2024 : मार्टिन गप्टिलचं धडाकेबाज शतक, फक्त 11 चेंडूत ठोकल्या 63 धावा
लीजेंड्स लीग स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडू निवृत्तीनंतर खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक काळ गाजवल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पण अजून तोच जोश पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने लीजेंड्स लीग स्पर्धेत चांगलंच मनोरंजन केलं.
1 / 6
लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या 12व्या सामन्यात मार्टिन गप्टिलने आक्रमक खेळी केली. षटकारांचा पाऊस पाडत शतक ठोकलं. सुरतच्या लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोणार्क सूर्या ओडिशा आणि साउथर्न सुपरस्टार्स आमनेसामने आले. या सामन्यात साउथर्न सुपरस्टार्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
2 / 6
कोणार्क सूर्या ओडिशाचा सलामीवीर रिचर्ड लेव्हीने डावाची सुरुवात करताना 21 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह 63 धावा केल्या. मधल्या फळीत युसूफ पठाणने फटकेबाजी करत 33 धावांचे योगदान दिले. यासह कोणार्क सूर्या ओडिशा संघाने 20 षटकात 9 गडी गमावून 192 धावा केल्या.
3 / 6
कोणार्क सूर्या ओडिशाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना साउथर्न सुपरस्टार्सचा डाव गडगडला. सलामीवीर श्रीवत्सव गोस्वामी केवळ 18 धावा करून बाद झाला. या धक्क्यानंतरही दुसऱ्या टोकाला उभा असलेल्या मार्टिन गप्टिलने डाव सावरला.
4 / 6
मार्टिन गप्टीलने मग कोणालाही दयामाया दाखवली नाही. मैदानात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. स्टीवर्टला तर अक्षरश: झोडून काढला. तो टाकत असलेल्या सहाव्या षटकात 6, 6, 6, 4, 6, 6 अशी फटकेबाजी करत 34 धावा केल्या. तसेच 48 चेंडूत शतक पूर्ण केलं.
5 / 6
शतकानंतर गप्टिलचा आक्रमक खेळ सुरुच होता. 15 व्या षटकात त्याने पुन्हा कहर केला. त्या षटकात चार षटकार आणि एका चौकारासह 28 धावा कुटल्या. त्याने फक्त 11 चेंडूत 62 धावा केल्या. अखेर 54 चेंडूंचा सामना करणाऱ्या गप्टिलने 11 उत्तुंग षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 131 धावांची खेळी केली. तसेच संघाला 16 व्या षटकातच विजय मिळवून दिला.
6 / 6
मार्टिन गप्टिलने लीजेंड्स लीग स्पर्धेत विक्रमांचा पाऊस पाडला आहे. मार्टिन गुप्टिल (131) धावांसह करत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. एका सामन्यात 10+ षटकार मारणारा पहिला फलंदाज होण्याचा विक्रमही केला. तसेच एकाच षटकात (34 ) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मानही मिळवला आहे. (फोटो- ट्विटर)