आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेनं नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. कारण मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीपुढे फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली.
भारतीय संघाचं चौथं षटक मोहम्मद सिराजने टाकलं आहे. या षटकात श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकाच षटकात चार गडी बाद झाल्याने श्रीलंकनं संघ बॅकफूटवर गेला.
मोहम्मद सिराजला या षटकात हॅटट्रीक घेण्यात अपयश आलं. मात्र चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. आशिया कप फायनलमध्ये सहा गडी बाद करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच भारताकडून एका षटकात 4 गडी बाद करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
मोहम्मद सिराजने पहिल्या चेंडूवर निस्संकाला 2 धावांवर असताना बाद केला. रवींद्र जडेजाने झेल घेतला. दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर समाराविक्रमाला पायचीत केलं. चौथ्या चेंडूवर असलंका आला आणि इशान किशनच्या हाती झेल देऊन बाद झाला. पाचव्या चेंडूवर चौकार आला. सहाव्या चेंडूवर धनंजय डिसिल्वा केएल राहुल याच्या हाती झेल देत तंबूत परतला.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत पाच गडी बाद करण्याचा विक्रमही सिराजच्या नावावर नोंदवला आहे. त्याने फक्त 16 चेंडूत पाच गडी बाद करत हा विक्रम नोंदवला आहे.
मोहम्मद सिराज याने वनडे क्रिकेटमध्ये 50 गडी बाद करण्याचा टप्पा गाठला आहे. 29 सामन्यात त्याने 50 विकेट्स घेतले आहेत. अजीत अगरकर (23 सामन्यात), कुलदीप यादव (24 सामन्यात), जसप्रीत बुमराह (28 सामन्यात), मोहम्मद सिराज (29 सामन्यात), मोहम्मद शमी (29 सामन्यात) हा टप्पा गाठला आहे.