आयपीएल 2025 लिलावापूर्वी पंजाब किंग्स मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे सहा खेळाडू रिटेन करण्याची परवानगी असताना पंजाब किंग्स फक्त दोन खेळाडू रिटेन करेल, असं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू अनकॅप्ड असणार आहेत.
पंजाब किंग्सने मागच्या पर्वात असलेल्या सर्वच स्टार खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नव्या संघाची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे इतर संघाच्या रिलीज केलेल्या खेळाडूंकडे पंजाबचं लक्ष असणार आहे. खासकरून ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे लक्ष असेल.
आयपीएल 2024 स्पर्धेत पंजाबकडून खेळलेल्या अनकॅप्ड शशांक सिंगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 14 सामन्यात 2 स्फोटक अर्धशतकांसह 354 धावा केल्या होत्या. संघाच्या विजयात त्याचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्याला अनकॅप्ड प्लेयर म्हणून कायम ठेवतील.
पंजाब किंग्स प्रभसिमरन सिंगला या पर्वात कायम ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मागच्या पर्वात त्याने शशांक सिंगप्रमाणे कामगिरी केली होती. 14 सामन्यात 2 अर्धशतकांसह 334 धावा केल्या होत्या. त्यामुळे प्रभसिमरन सिंगला रिटेन केलं जाईल.
प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंग हे दोघेही टीम इंडियात खेळलेले नाहीत. त्यामुळे त्यांची अनकॅप्ड प्लेयर म्हणून गणना होणार आहे.
या दोघांना प्रत्येकी 4 कोटी दिले तर पर्समधून फक्त 8 कोटी खर्च होतील. म्हणजेच 120 कोटीतून 112 कोटी रुपये उरतील. त्यामुळे ऋषभ पंत असो की, आणखी कोणता प्लेयर त्यासाठी मोठी डाव लावता येईल.