ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅनगाँग ओव्हल मैदानावर शतक झळकावून नवा विश्वविक्रम रचला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे.
डेव्हिड वॉर्नर याने 93 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 106 धावा केल्या. या शतकासह डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला खेळायचा.त्याने एकूण 45 शतके झळकावली आहेत. आता वॉर्नरने हा विश्वविक्रम मोडला असून तो अव्वल स्थानावर आहे.
डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून एकूण 46 शतके झळकावली आहेत. यात 20 वनडे आणि 25 कसोटी शतकांचा समावेश आहे. तसेच एक टी-20 शतकही केले आहे.
सलामीला सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 46 शतकांसह डेव्हिड वॉर्नर पहिल्या, 45 शतकांसह सचिन तेंडुलकर दुसऱ्या, 42 शतकांसह ख्रिस गेल तिसऱ्या, 41 शतकांसह सनथ जयसूर्या चौथ्या स्थानावर आहे.
डेव्हिड वॉर्नरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या सचिन तेंडुलकरच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे.सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 शतके झळकावली आहेत.