संजू सॅमसनच्या शिरपेचात मानाचा तुरा, मागच्या पाच सामन्यात सर्वांना दिला धोबीपछाड
टी20 क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून संजू सॅमसनच्या नावाचा बोलबाला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन शतकं ठोकत संजू सॅमसनने लक्ष वेधून घेतलं होतं. आता संजू सॅमसनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
1 / 5
2024 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या वर्षातील टीम इंडियाचं वनडे आणि टी20 मालिका संपली आहे. त्यामुळे भारतीय संघ या वर्षात फक्त चार कसोटी खेळणार आहे. त्यानंतर उर्वरित एक कसोटी नव्या वर्षात असेल. म्हणजेच वनडे आणि टी20 चा एकही सामना नसेल.
2 / 5
भारताने टी20 क्रिकेटचा शेवट गोड केला. दक्षिण अफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका 3-1 ने जिंकली. या मालिकेत एकूण 4 शतकं पाहायला मिळाली. संजू सॅमसन आणि तिलक वर्माने प्रत्येकी दोन शतकं झळकावली. असं असताना संजू सॅमसनच्या खेळीची जोरदार चर्चा रंगली आहे. संजू सॅमसनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
3 / 5
संजू सॅमसन हा 2024 या वर्षात भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आयसीसी टी20 क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सूर्यकुमार यादवलाही मागे टाकले आहे. सुर्यकुमार यादवने 17 डावात 429 धावा केल्या आहेत.
4 / 5
संजू सॅमसनने 13 सामन्यांच्या 12 डावात 436 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने तीन शतकं आणि 1 अर्धशतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे, या वर्षात संजू सॅमसन पाचवेळा शून्यावर देखील बाद झाला आहे.
5 / 5
संजू सॅमसन षटकार मारण्याच्या बाबतीतही अव्वल ठरला आहे. 2024 या वर्षात संजू सॅमसनने 31 षटकार मारले आहेत. संजू सॅमसनने आपलं संघातील स्थान पक्कं केलं असून 2025 या वर्षात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल. कारण 2026 मध्ये भारतात टी20 वर्ल्डकप होणार आहे.