वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेतून बाजार उठला आहे. विंडिजचं वर्ल्ड कप पात्रता फेरीतच आव्हान संपुष्टात आलं आहे. स्कॉटलँडने पराभूत केल्याने तब्बल 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या आणि क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या विंडिजवर वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली.
वेस्ट इंडिजने 1975 साली ऑस्ट्रेलिया आणि 1979 साली इंग्लंडला पराभूत करत सलग 2 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला होता. विंडिजने क्लाईव लॉईड यांच्या नेतृत्वात ही कामिगिरी केली होती.
विंडिजला आता स्कॉटलँड, नेदरलँड आणि त्याआधी झिंबाब्वेकडून पराभव स्वीकारावा लागला. विंडिजला या 3 मोठ्या उलटफेरांचा सामना करावा लागला.
सुपर 6 राउंडमधील तिसऱ्या सामन्यात स्कॉटलँडने वेस्ट इंडिजवर 7 विकेट्स विजय मिळवला. विंडिजने विजयासाठी दिलेलं 182 धावांचं आव्हान स्कॉटलँडने 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
याआधी 26 जून रोजी नेदरलँडने विंडिजला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केलं. सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने विंडिजवर एकतर्फी विजय मिळवला.
तर 24 जून रोजी झिंब्बावेने वेस्ट इंडिजचा 35 धावांनी धुव्वा उडवला. अशा प्रकारे विंडिजला लिंबू टिंबू म्हणून गणल्या जाणाऱ्या संघांकडून पराभूत व्हावं लागलं.
दरम्यान विंडिज टीम आता बाहेर पडल्याने भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत 2 वेळचा जग्गजेता संघ खेळताना दिसणार नाही.