टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पॅट कमिन्सची हॅटट्रीक, आतापर्यंत या यादीत कोण कोण ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अखेर हॅटट्रीकची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सुपर 8 फेरीत बांगलादेशविरुद्ध ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये हॅटट्रीक घेणारा पॅट कमिन्स हा सातवा गोलंदाज ठरला आहे. चला जाणून घेऊयात आतापर्यंत या यादीत कोण कोण आहे ते..
1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश हे संघ आमनेसामने आले होते. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बांगलादेशने 20 षटकात 8 गडी गमवून 140 धावा केल्या आणि विजयासाठी 141 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने 11.2 षटकात 2 गडी गमवून 100 धावा केल्या आणि पावसाने हजेरी लावली. यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाचा 28 धावांनी विजय झाला.
2 / 6
ऑस्ट्रेलिया बांग्लादेश सामन्यात हॅटट्रीक घेण्याची किमया पॅट कमिन्सने साधली. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतील ही पहिली हॅटट्रीक आहे. तसेच टी20 वर्ल्डकप इतिहासातील ही सातवी हॅटट्रीक आहे.
3 / 6
पॅट कमिन्सने दोन षटकात ही हॅटट्रीक पूर्ण केली. 18 व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूवर विकेट घेतल्या. त्यानंतर 20 षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेत पहिल्या हॅटट्रीकची नोंद केली.
4 / 6
पॅट कमिन्स वैयक्तिक तिसरं आणि संघाचं 18वं षटक टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर महमुदुल्लाह याला त्रिफळाचीत केले. त्यानंतर सहाव्या चेंडूवर महेदी हसनला झाम्पाच्या झेल सोपवून तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक चौथं टाकण्यासाठी पॅट कमिन्स आला आणि पहिल्याच चेंडूवर तौहिद हृदोय याची विकेट काढली.
5 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील ही सातवी हॅटट्रीक आहे. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीने बांगलादेशविरुद्ध केपटाऊनमध्ये पहिली हॅटट्रीक घेतली होती. त्यानंतर 2021 मध्ये आयर्लंडच्या कर्टीस कॅम्परने नेदरलँडविरुद्ध, 2021 मध्ये श्रीलंकेच्या वानिंदू हसारंगाने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध, 2021 मध्ये कगिसो रबाडाने इंग्लंडविरुद्ध, यूएईच्या कार्थिक मैयप्पनने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि आयर्लंडच्या जोशुआ लिटलने 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रीक घेतली होती.
6 / 6
टी20 क्रिकेटमधये ऑस्ट्रेलियाकडून हॅटट्रीक घेणारा पॅट कमिन्स हा चौथा गोलंदाज आहे. यापूर्वी 2007 मध्ये ब्रेट ली, 2020 मध्ये एश्टन अगर, 2021 मध्ये नाथन एलिस आणि आता पॅट कमिन्सने हॅटट्रीक घेतली आहे.