रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये इतर 9 संघाविरुद्ध 9 शहरांमध्ये 9 साखळी सामने खेळणार आहे. टीम इंडियाला यासाठी तब्बल 8 हजार 400 किलोमीटर इतरा प्रवास करावा लागणार आहे. तसेच टीम इंडिया सेमी फायनल आणि फायनलमध्ये पोहचल्यास हीच आकडेवारी 42 दिवस, 11 सामने आणि 9 हजार 700 किमी प्रवास अशी होईल.
टीम इंडियाचे सामने रात्री 11 वाजता संपतील. टीम इंडियाला दर तिसऱ्या दिवशी विमान प्रवास करावा लागेल. सामन्यानंतर प्रवासामुळे खेळाडूंना विश्रांतीची संधी क्वचितच मिळेल. त्यामुळे या प्रवासामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
"9 टीम आणि 9 शहरांमधील सामन्यांमुळे क्रिकेट चाहत्यांना आपल्या लाडक्या क्रिकेटरला स्टेडियममध्ये पाहण्याची संधी मिळेल. त्यामुळे टीम इंडियाला हा प्रवास करावा लागणार आहे" अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.
पाकिस्तानला हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरुत प्रत्येकी 2 सामने खेळायचे आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 15 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला एकूण 6 हजार 849 किमी इतका प्रवास करावा लागेल. तसेच हैदराबाद आणि चेन्नईत पाकिस्तानला एका आठवड्याचा वेळ मिळेल. तर भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला कमी प्रवास करायचाय. ऑस्ट्रेलियाला 6 हजार 907 आणि इंग्लंडला 1 हजार 171 किमी इतका प्रवास करावा लागेल.