वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 14 फेब्रुवारीपासून वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात होईल. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स या संघात होणार आहे. असं असताना दोन संघांनी कर्णधार बदलला आहे.
मुंबई इंडियन्सचं तिसऱ्या पर्वातही हरमनप्रीत कौर नेतृत्व करणार आहे. मागच्या दोन पर्वात तिने ही भूमिका यशस्वीरित्या पेलली आहे. इतकंच काय तर पहिल्या जेतेपदाचा मानही पटकावला आहे. त्यामुळे तिच्या खांद्यावर पुन्हा नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
युपी वॉरियर्सने यंदाच्या पर्वात भारतीय दीप्ती शर्माची निवड कर्णधार म्हणून केली आहे. अलिसा हिलीने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे युपी वॉरियर्सने यंदाच्या पर्वात दीप्ती शर्माच्या खांद्यावर धुरा सोपवली आहे.
दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा मेग लॅनिंगवर विश्वास टाकला आहे. तिच्या नेतृत्त्वात दिल्लीने दोन वेळा अंतिम फेरी गाठली होती. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली. पहिल्या पर्वात मुंबईने, दुसऱ्या पर्वात बंगळुरुने पराभूत केलं होतं.
गुजरात जायंट्सने यंदाच्या पर्वात नवा कर्णधार दिला आहे. गुजरात जायंट्स फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनरला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. यापूर्वी कर्णधाराची धुरा बेथ मुनीच्या खांद्यावर होती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पुन्हा एकदा स्मृती मंधानावर विश्वास टाकला आहे. स्मृतीने मागच्या पर्वात टीमला जेतेपद मिळवून दिलं होतं. त्यामुळे यंदाही त्याच कामगिरीची अपेक्षा आहे. दरम्यान, स्मृती मंधाना जबरदस्त फॉर्मात आहे.