आयपीएलच्या 18व्या पर्वाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्यात विजयी सलामी कोण देणार, याची उत्सुकता आहे.
आरसीबीने या स्पर्धेत चांगल्या कामगिरीसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. रजत पाटीदारकडे नेतृत्व सोपवलं असून नव्या बांधलेला संघ नेटमध्ये घाम गाळत आहे. दुसरीकडे, स्टार फलंदाज विराट कोहली अजूनही संघात सहभागी झालेला नाही.
विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच मायदेशी परतला आहे. त्यामुळे काही दिवस विश्रांती घेऊन संघात सहभागी होणार आहे. पण त्या आधीच कोहलीच्या नव्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
विराट कोहली प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीपूर्वी त्याची केशरचना बदलतो. कोहली गेल्या अनेक वर्षांपासून हा ट्रेंड राबवत आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने आपली हेअरस्टाईल बदलल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी कोहलीने आपली हेअरस्टाईल बदलली होती. तेव्हा प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट जॉर्डन तबाकमन यांनी कोहलीला एक नवीन लूक दिला होता. आता, भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट आलिम हकीम यांनी कोहलीला एक नवीन लूक दिला आहे.