भारताची अष्टपैलू क्रिकेटपटू पूजा वस्त्राकरने ICC महिला विश्वचषक 2022 स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड केला आहे. यावेळी तिने या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार ठोकला आहे. हा षटकार तब्बल 81 मीटरचा होता, ज्यामुळे तिने एकाच वेळी दोन खेळाडूंना मागे टाकलं आहे.
या सामन्यात पूजा वस्त्राकर 28 चेंडूत 34 धावा करून सामन्यातील अखेरच्या चेंडूवर धावबाद झाली. तिने आपल्या डावात 2 षटकार लगावले, ज्यामध्ये भारतीय डावातील 49 व्या षटकातील षटकार हा या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात लांब षटकार होता. पूजाच्या बॅटमधून निघालेल्या या षटकाराने तिची आणि हरमनची 50 धावांची भागीदारीही पूर्ण झाली.
पूजाने 81 मीटर लांब षटकार मारून दोन खेळाडूंना मागे टाकले आहे. तिने दक्षिण आफ्रिकेच्या क्लो ट्रायॉन आणि भारताच्या स्मृती मानधना यांच्या 80 मीटर लांब षटकाराला मागे टाकले आहे. मानधनाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या डावात 80 मीटर लांब षटकार ठोकला होता.
या तीन खेळाडूंनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 78 मीटरचा षटकार ठोकणाऱ्या पाकिस्तानच्या निदा दारचा क्रमांक लागतो. त्याचवेळी वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजने इंग्लंडविरुद्ध 77 मीटर लांब षटकार ठोकला होता. (All Photo: Twitter/AFP)