लासलगाव : ऊस गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात ऊस साखर कारखान्यावर जाण्याऐवजी फडातच त्याची राखरांगोळी होण्याच्या घटना वाढत आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना शेतकरी वाढीव उत्पादनाचे स्वप्न पाहत आहे. मात्र, एका रात्रीतून शेतकऱ्यांच्या या स्वप्नांचा चुराडा होत आहे. कारण शार्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही निघत नाही अशी अवस्था आहे. सिन्नर तालुक्यातील वल्हेवाडी शिवारातील निवृत्ती यादव यांचा अडीच एकरातील ऊस याच कारणामुळे जळाला आहे. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.