दाक्षिणात्य कलाकारांचं फॅन फॉलोव्हिंग मोठ्या प्रमाणात आहे. दक्षिण फिल्म इंडस्ट्रीला खूप प्रेम दिलं जातं. दक्षिणमधील कलाकारांना लोकांकडून भरपूर प्रेम मिळतं.
दाक्षिणात्य चित्रपटांमधील मोठं नाव, ज्यांना लोकांनी देवाचा दर्जा दिला, ज्यांचे चाहते जगभरात आहेत असे सुपरस्टार रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचं खरं नाव 'शिवाजी गायकवाड' आहे.
शिवाजी गायकवाड म्हणजेच सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा 70वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्त त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी जाणून घेऊया.
रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 ला झाला. ते सुरुवातीला एक कंडक्टर आणि कुली म्हणून काम करायचे. मात्र त्यांची स्टाइल नेहमीच वेगळी होती. याच स्टाइलनं त्यांना सुपरस्टार बनवलं. कंडक्टर असतानासुद्धा ते या स्टाइलनं अनेक लोकांना इंप्रेस करायचे.
रजनीकांत यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीला त्यांना निगेटिव्ह भूमिका मिळाल्या मात्र त्यांनी प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला.
सन 1977 मध्ये रिलीज झालेल्या 'भुवन ओरु केल्वीकुरी' या चित्रपटात त्यांना मुख्य भूमिका मिळाली आणि मग त्यांच्या आयुष्याला नवीन मार्ग मिळाला.
रजनी आणि मुथुरमन यांच्या जोडीनं 90 वं दशक चांगलंच गाजवलं. त्यांनी जवळजवळ 24 चित्रपटांमध्ये सोबत काम केलं.
दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच रजनीकांत यांची जादू हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा दिसली.
80 च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा गाजवली. त्यांनी 'कानून', 'गिरफ्तार', 'वफादार', 'बेवफाई', 'भगवान दादा', 'असली नकली', 'इंसाफ' या चित्रपटांमध्ये त्यांनी कमालीचा अभिनय केला.
तेव्हापासून ते आतापर्यंत ते सतत सुपरहिट चित्रपट देत आहेत. मागच्या काही काळात त्यांनी काबिल, लिंगा, 2.0 पेटा आणि दरबार असे सुपरहिट सिनेमे दिले. त्यांना भारत सरकारद्वारे पद्म भूषण आणि पद्म विभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.