पैशांचे मानसशास्त्र समजून घेतल्यास अनेकांचा श्रीमंतीचा प्रवास सुखकर होईल. पैसा कुठे आणि कसा गुंतवणूक करावा याचं धोरण निश्चित हवे. अनेक जण कर वाचवण्यासाठी, विमा खरेदीलाच महत्त्व देतात. त्यांना पैसा कुठे खर्च करावा हे कळत नाही. नोकरी सुरू होताच तुमचं आर्थिक व्यवस्थापन सुरू व्हायला हवं.
तुम्हाला पैशांचं नियोजन, व्यवस्थापन आणि गुंतवणुकीचा मंत्र माहिती नसेल. तर तुमचा पगार अन्य ठिकाणी खर्च होईल. नाहीतर बँकेच्या खात्यात पडून राहूनही त्यात वृद्धी होणार नाही. तुम्हाला बचत करणे आणि त्याची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. भविष्यातील महागाईविरोधात ही रक्कम तुम्हाला उपयोगी पडेल.
सुरुवातीला गुंतवणूक करताना सहाजिकच आपण अनेकांचा सल्ला घेतो. त्यानुसार विविध ठिकाणी गुंतवणूक करतो. पण लोकांच्या सल्ल्यानुसार तुमचे आर्थिक गणित बसवण्याची चूक करू नका. तुमची गरज आणि प्राथमिकतेला आधी महत्त्व द्या. नंतर गुंतवणुकीची योजना आखा.
तरुणांनी त्यांच्या पैशांबाबत जास्त प्रयोग करू नये. गुंतवणूक करण्यापूर्वी त्या योजनेचे फायदे-तोटे आणि तुमची गरज लक्षात घ्या. कुणी सांगितले म्हणून अर्ध्या माहितीवर कुठे ही गुंतवणूक करू नका. पैसा गुंतवणूक करण्यापूर्वी त्यातील धोके आणि जोखिमेची माहिती आवश्यक घ्या.
गुंतवणूक करताना भविष्यातील तुमच्या योजना काय आहेत, याची एक यादी तयार करा. घर खरेदी, वाहन खरेदी, घरातील मंगलकार्य, बहिणीचे लग्न, इतर जबाबदाऱ्या या सर्वांचा धांडोळा घ्या. पुढील शिक्षण असेल. इतर शहरात जाण्याचे नियोजन असेल. वर्षाकाठी कुठे तरी फिरण्यासाठी वा इतर कारणासाठी पैशांचे व्यवस्थापन करत असाल तर स्वतःसा आर्थिक स्वंयशिस्त जरूर लावा. नाहीतर तुमचे श्रीमंतीचे स्वप्न भंग व्हायला वेळ लागणार नाही.