आजकाल डोकेदुखीची समस्या खूप कॉमन झाली आहे. त्यामागे बरीच कारणं असू शकतात. कोणाचं कामाच्या ताणामुळे डोकं दुखतं, तर कोणाला डोळ्यांच्या त्रासामुळे डोकेदुखी सुरू होते. थंड हवामान हेदेखील डोकेदुखीचे कारण असू शकते. काही घरगुती उपचारांनी त्यापासून मुक्ती मिळवता येऊ शकते.
पुदीना तेल - डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी पुदीन्याच्या तेलाचा उपाय प्रभावी ठरू शकतो. खोबरेल तेलामध्ये पुदीन्याच्या तेलाचे काही थेंब टाकावेत व हे तेल कपाळावर लावून हलक्या हाताने मसाज करावा.
कॅफेनमुळे डोकेदुखी पासून मिळू शकतो आराम - हॉट चॉकलेट, कॉफी किंवा चहा असे कॅफेनयुक्त गरम पेय प्यायल्याने डोकेदुखीपासून तत्काळ आराम मिळू शकतो. कॅफेनमुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात, त्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
आल्याचा काढा ठरेल गुणकारी - आल्यामध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट व अँटी-इन्फ्लेमेटरी घटक हे डोकेदुखी तसेच सुस्ती, आळस व उलटी येणे, या समस्या दूर करण्यास प्रभावी ठरतात. याचा लाभ घेण्यासाठी स्वच्छ धुतलेलं आलं पाण्यात टाकून उकळावे व त्यात थोडा मध घालून ते पेय सेवन करावे.
शेक घेणे - हॉट बॅग किंवा आईस पॅकने डोकं शेकल्यानेही डोकेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. यामुळे आपले स्नायू रिलॅक्स होतात व त्यामुळे हळूहळू डोकेदुखी कमी होते.