एक वर्षापूर्वी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, त्यामुळे वाहन उद्योगातील विक्री पूर्णपणे ठप्प झाली होती. परंतु कालांतराने सर्वकाही सुरळीत होऊ लागले आहे आणि आज ऑटोमोबाईल क्षेत्रात भरभराट पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात देशात एकूण 3,20,487 प्रवासी वाहने (Passengers Vehicle) विकली गेली आहेत. मार्च महिन्यातील वाहनांच्या विक्रीबाबतची आकडेवारी समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात देशात कोणत्या गाड्यांना भारतीय ग्राहकांनी सर्वात जास्त पसंती दर्शवली आहे.
मारुती सुझुकी कंपनीची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्ट विक्रीच्या बाबतीत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर विराजमान झाली आहे. गेल्या महिन्यात मारुतीने स्विफ्टच्या 21,714 युनिट्सची विक्री केली आहे. तर फेब्रुवारी महिन्यात कंपनीने स्विफ्टच्या 18.696 युनिट्सची विक्री केली होती.
मारुती सुझुकीच्या Baleno कारने विक्रीच्या बाबतीत देशात दुसरं स्थान पटकावलं आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने Baleno च्या एकूण 21,217 युनिट्सची विक्री केली आहे. फेब्रुवारीत हा आकडा 20,070 युनिट्स इतका होता.
या यादीत तिसऱ्या स्थानी मारुती सुझुकीचीच कार आहे. मारुती सुझुकीची WagonR 18,757 युनिट्स विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारीत हा आकडा 28,728 युनिट्स इतका होता. याचाच अर्थ या महिन्यात WagonR चा सेल खूपच कमी झाला आहे.
या यादीत चौथ्या क्रमांकावर मारुतीची अल्टो ही कार आहे. गेल्या महिन्यात या कारच्या एकूण 17,401 युनिट्सची विक्री झाली आहे. फेब्रुवारीमध्ये हाच आकडा 16,919 वाहनांचा होता.
देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत पहिल्या चारही गाड्या या मारुती सुझुकीच्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावरील गाडी ही ह्युंदाय कंपनीची आहे. ह्युंदायची क्रेटा पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात ह्युंदायने क्रेटाच्या एकूण 12,640 युनिट्सची विक्री केली आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये हा आकडा 12,428 युनिट इतका होता.
देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांच्या यादीत मारुतीचं वर्चस्व कायम आहे. कारण टॉप टेनमधील सहाव्या क्रमांकावरील वाहनदेखील मारुतीचंच आहे. गेल्या महिन्यातील एकूण 11,547 युनिट्स विक्रीमुळे मारुती सुझुकी ईको ही कार विक्रीच्या बाबतीत सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.
मारुती सुझुकी डिझायर 11,434 युनिट्स वाहनांच्या विक्रीसह सातव्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये मारुती सुझुकीने डिझायरच्या 11,901 युनिट्सची विक्री केली होती.
विक्रीच्या बाबतीत मारुती सुझुकी विटारा ब्रेझा आठव्या क्रमांकावर आहे. कंपनीने मार्च 2021 मध्ये विटारा ब्रेझाच्या एकूण 11,274 युनिट्सची विक्री केली आहे.
9 व्या क्रमांकावर ह्युंदायची लोकप्रिय हॅचबक ग्रँड i10 ही कार आहे. कंपनीने या कारच्या 11,020 युनिट्सची विक्री केली आहे. फेब्रुवारीमध्ये हाच आकडा 10,270 युनिट्स इतका होता.
ह्युंदाय व्हेन्यू ही कार या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने या गाडीच्या 10,722 युनिट्सची विक्री केली आहे. फेब्रुवारीत कंपनीने व्हेन्यूच्या 10,222 युनिट्सची विक्री केली होती.