Photos | ‘शाळा बंद, मात्र शिक्षण सुरु’, वोपाकडून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण
वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन म्हणजेच वोपा या संस्थेने कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 1 ली ते 10 पर्यंतच्या सर्व मुलांना मोफत ऑनलाईन शिक्षणाचा मंच उलब्ध करुन दिला आहे.
-
-
वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन म्हणजेच वोपा या संस्थेने कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या सर्व मुलांना मोफत ऑनलाईन शिक्षणाचा मंच उपलब्ध करुन दिला आहे. व्ही-स्कूल असं या प्लॅटफॉर्मचं नाव आहे. हे बीड जिल्ह्यातील इयत्ता दहावीचे विद्यार्थी असून ते गावाकडे गोठ्यात बसून व्ही-स्कूलच्या मदतीने आपला अभ्यास करत आहेत.
-
-
हा आहे बीड जिल्ह्यातील केज येथे राहणारा गणेश. हा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. ऑनलाईन अभ्यास करताना पाठाचे चांगले व्हिडिओ शोधणे व पुढे जाऊन चांगल्या शिक्षकांचे व्हिडिओ शोधणे यात त्याचा बराचसा वेळ जात असे. त्यामुळे त्याला वेळेत अभ्यास पूर्ण करता येत नसे. परंतु वोपा या संस्थेने निर्माण केलेल्या VSchool या प्लेटफॉर्ममुळे आता त्याला चांगले व्हिडीओ शोधण्यासाठी लागणारा वेळ वाचला आणि वेळेत अभ्यास पूर्ण करणे शक्य झाले.
-
-
कनक कोठारे, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात राहणारी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे. ती सांगते, “ऑनलाईन साधनांचा वापर करून अभ्यास करत असताना माझा अधिक वेळ चांगला व्हिडिओ शोधण्यासाठी खर्च होत असे. परंतु आतामात्र चांगला व्हिडिओ शोधण्यात माझा जास्त वेळ खर्च होणार नाही. VSchool या प्लॅटफॉर्ममुळे मला चांगले व्हिडिओ तर मिळालेचं पण त्यासोबतच मला ऑडीओ, टेस्ट पेपर आणि इतर बऱ्याच प्रकाराचे शैक्षणिक साहित्य मिळाले. टेस्ट पेपर मुळे पालकांना पण त्यांच्या मुलांना किती समजले हे कळतेय. अभ्यासासाठी VSchool चा वापर करून मी खूप आनंदी झाली आहे.”
-
-
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आदित्यची आई शीतल शेटे यांनीही व्ही-स्कूल प्लॅटफॉर्मबद्दल आपली भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मी संगमनेर तालुक्यात राहते. माझा मुलगा आदित्य हा इयत्ता दुसरीत शिकत आहे. टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्या. त्याच्या शाळेने काही अडचणींमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु केले नव्हते. मला समजत नव्हते की मी माझ्या मुलाला घरीच कसे शिकवू. मला एका मैत्रीणीकडून VSchool विषयी समजले. यानंतर वोपा संस्थेच्या VSchool या ऑनलाईन शिक्षणाच्या प्लेटफोर्ममुळे मला माझ्या मुलाला घरच्या घरी हसत खेळत शिकवणे शक्य झाले.
-
-
पुण्यातील जुन्नर येथे राहणारा इयत्ता दहावीचा विद्यार्थी शुभम पानसरे तर वोपाच्या या प्लॅटफॉर्मवर भलताच खूश आहे. तो म्हणाला, “VOPA चे शिक्षणातील काम हे जगातील एक नंबर काम असेल, हे माझ्या एकट्याचे नाही तर इतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मत आहे. यात काडीमात्र वाद नाही. कोरोनामुळे माझी शाळा बंद आहे. मी ग्रामीण भागातील शाळेत शिकत असल्यामुळे आमचे ऑनलाईन क्लास सुरु नव्हते. त्या काळात मी VOPA संस्थेच्या अभ्यासवर्गाशी जोडलो गेलो आणि माझे थांबलेले शिक्षण पुन्हा सुरु झाले. VOPA मुळे मला अभ्यासात जशी मदत मिळतेय तशी मदत माझ्या वर्गातील इतर मित्र-मैत्रिणींना पण मिळावी यासाठी मी VOPA च्या अभ्यासवर्गाची लिंक माझ्या शाळेच्या ग्रुपवर पाठवली. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी माझे धन्यवाद तर मानलेच, पण माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा माझे धन्यवाद मानले. VOPA चे काम हे खूप मोठे आहे. त्यांनी केलेल्या मदतीसाठी मी त्यांचा आभारी आहे.”
-
-
सांगोला तालुक्यातील इयत्ता नववीची विद्यार्थिनी ताई संतोष केळेकर म्हणाली, “टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्या, जेव्हा माझ्या शाळेने ऑनलाईन शिक्षण सुरु केले नव्हते. तेव्हा VSchool ने दिलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे मला माझे शिक्षण सुरु ठेवता आले. गणित विषयाचा अभ्यास करण्यासाठी तर मला फार मदत झाली. मला VSchool हा प्लेटफोर्म इतका आवडला आहे की अजून कितीवेळा धन्यवाद बोलू हे समजत नाही. Thank you so much.”
-
-
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात राहणारी वृषाली ही इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे. ती म्हणते, “टाळेबंदीमुळे शाळा बंद झाली. परंतु VSchool ने दिलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे माझे थांबलेले शिक्षण पुन्हा सुरु झाले. घरी राहून अभ्यास करण्यासाठी VSchool या प्लेटफोर्मची फार मदत होत आहे. VSchool मुळे मला विज्ञान हा विषय आवडू लागला आहे. Thank you so much”. डोंगरकिन्ही गावात राहणारा आतिश प्रश्न विचारतो, “ कोरोनामुळे अचानक शाळा बंद झाल्या आणि ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. परंतु ज्या पालाकांना एकापेक्षा अधिक पाल्य आहेत व घरात एकच मोबाईल आहे किंवा असे विद्यार्थी ज्यांच्याकडे मोबाईलच नाही त्यांचे काय? ते शिक्षणातून बाहेर फेकेले जातील का?”
-
-
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही गावात राहणारा इयत्ता दहावीचा विद्यार्थी आतिश आणि त्याच्या वर्गमित्रांना देखील व्ही-स्कूल प्लॅटफॉर्मचा मोठा उपयोग झाला. डोंगरकिन्ही गावात राहणाऱ्या 10 मुलांकडे स्वतःचा मोबाईल नव्हता आणि त्यांच्या पालकांकडेसुद्धा मोबाईल नव्हता. याच गावातील आतिशला हे माहिती होते. केवळ मोबाईल नाहीये म्हणून आपले 10 वर्गमित्र मुख्य प्रवाही शालेय शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आतीशने स्वतःच्या फोनचा वापर ग्रुप स्टडीसाठी करायचा असे ठरवले. सर्व विद्यार्थी दिवसभर आपापल्या पालकांना शेतीच्या कामांत किवा घरकामांत मदत करण्यात व्यस्त असत. म्हणून सर्वांनी संध्याकाळी एकाच वेळेला एका ठेकाणी भेटून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. आतिशने केलेल्या सहकार्यामुळे आज त्याच्या वर्गमित्रांना VSchool या प्लॅटफॉर्मचा वापर करून शक्य त्या वेळेस विनाशुल्क ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य झाले.
-
-
जालन्यातील लोणगावची कोमल सुदाम शरणागत महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, लोणगाव (ता. मोकरदन, जि. जालना) या शाळेत शिकते. ती म्हणते, “समुद्रात पाणी आहे, पण लाटा येत नाहीत आणि तुमच्या कार्याचे वर्णन शब्दात करता येत नाही. तुमच्यामुळे आज गोरगरिबांच्या मुलांना मदत मिळत आहे. तुमच्यामुळे आज त्यांच्या स्वप्नांना चालना मिळाली. हे काम तुम्ही असंच चालू ठेवा आणि आम्ही पण तुम्हाला सहकार्य करू.”
-
-
तुळजापूरमधील घुलहाली येथे राहणारा इयत्ता नववीचा विद्यार्थी प्रीतम घोडके म्हणाला, “व्हीस्कुलविषयी जितकं बोलावं तितकं कमीच आहे. कोरोनामुळे सध्या माझी शाळा बंद आहे. शाळेने ऑनलाईन शिक्षणामध्ये पाठवेले pdf आणि व्हिडिओ याच्या आधारे पाठ समजून घेणे खूप कठीण जात होते. सध्या ऑनलाईन शिक्षणाव्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय उरला नाहीये. परंतु मला ऑनलाईन शिक्षण कसे घेता येईल हे समजत नव्हते. VSchool मुळे मला चांगले व्हिडिओ तर मिळालेच पण त्यासोबत सोप्या शब्दात लिहिलेली माहिती, चित्रे आणि टेस्ट पेपरसुद्धा मिळाले.”
-
-
हे आहेत इंदिरानगर येथे राहणाऱ्या फासे पारधी समाजातील विद्यार्थी.
-
-
वोपाच्या व्ही-स्कूल प्लॅटफॉर्मचा उपयोग करणारा राज गोरे सांगतो, “लॉकडाऊनपासून मला दहावीचा अभ्यास कसा करायचा हे कळत नव्हते. मला खूप टेन्शन येत होते. त्यावेळी मला VSchool विषयी समजले. VOPA या संस्थेने निर्माण केलेल्या VSchool या प्लॅटफॉर्ममुळे मला दहावीचा अभ्यास करणे शक्य झाले. मला ऑनलाईन शिक्षण घेताना व्हिडिओ शोधायला खूप वेळा लागायचा. VOPA मुळे आता मला चांगले व्हिडिओ शोधावे लागत नाहीत. edu.vopa.in या वेबसाईटवर जाऊन मी माझी इयत्ता, विषय आणि पाठ क्रमांक टाकला की एकाच पेजवर त्या पाठासंबंधीचे चांगले व्हिडीओ, माहिती, चित्रे आणि शेवटी टेस्ट पेपर इत्यादी गोष्टी असतात. म्हणूनच खूप कमी वेळेत माझा जास्त अभ्यास होऊ लागला आहे.”