जसे मेकअप करण्यासाठी काही नियम असतात, तसेच तो मेकअप रिमूव्ह करण्यासाठीही काही नियम पाळावे लागतात. मात्र बरेच लोक मेकअप काढताना काही चुका करतात तर काही जण बऱ्याच महागड्या उत्पादनांचाही वापर करतात. पण तुम्हाला नैसर्गिक पद्धतीनेही मेकअप रिमूव्ह करायचा असेल तर काही टिप्सचा वापर करू शकता.
नारळाचे तेल : त्वचेची काळजी घेण्यासाठी नारळाचे तेल उत्तम उपाय आहे. त्वचा मॉयश्चराइज करण्यापासून ते मेकअप रिमूव्ह करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. नैसर्गिक पद्धतीने मेकअप रिमूव्ह करताना, एका वाटीत थोडं नारळाचे तेल घेऊन त्यामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो चेहऱ्यावर लावून हळूहळू मेकअप पुसावा. नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
गुलाबपाणी : त्वचेसाठी गुलाब पाणी हेही उत्तम ठरते. याचा वापर करणेही खूप सोपे आहे. त्यासाठी एका वाटीत गुलाबपाणी घेऊन त्यामध्ये कापूस भिजवून तो चेहऱ्यावर हळूवार हाताने लावा. यामुळे चेहऱ्यावर ओलावा कायम राहील.
बेकिंग सोडा व मध : मध आणि बेकिंग सोड्याचे मिश्रण याचा वापर करूनही नैसर्गिक पद्धतीने मेकअप रिमूव्ह करता येतो. बेकिंग सोडा हा एक्स्फोलिएटर म्हणून कार्य करतो. आणि मधामुळे आपली त्वचा मऊ राहण्यास मदत होते. पण आपल्या त्वचेचा पोत ओळखून त्यानुसार हा उपाय करावा.
कोरफडीचे जेल : त्वच्या आणि केसांची काळजी घेण्यासाठी कोरफड उत्तम मानली जाते. तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही मेकअप काढण्यासाठी कोरफडीचा वापर करू शकता. त्यासाठी चेहऱ्यावर कोरफड किंवा कोरफडीचे जेल लावावे व हलक्या हाताने मसाज करावा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.