मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज (4 डिसेंबर) पक्षांतर्गत धुसफुशीवर रोखठोक भाष्य केलं (Eknath Khadse on Pankaja Munde and BJP). यावेळी त्यांनी नाराजांची मोट बांधायची गरज नसते, तर ते आपोआपोच एकत्र येतात, असंही सुचक विधान केलं. भाजप नेत्या आणि माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानंतर खडसेंनी पत्रकारांशी संवाद केला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला (Eknath Khadse on Pankaja Munde and BJP).
एकनाथ खडसेंचे 10 रोखठोक मुद्दे खालीलप्रमाणे-
- पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव पक्षाविरोधी कामगिरी करणाऱ्यांमुळे झाला. असं करणाऱ्यांची नावं वरिष्ठांकडे पाठवली आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही नावे आहेत, त्यांनी चौकशी करुन विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करावी. आता कारवाईची प्रतीक्षा आहे.
- जे घडलं आहे, पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे ती मी वरिष्ठांना कळवली आहे. बहुजन नेतृत्त्वाला डावलणं हे दुर्दैवानं घडलं आहे, तिकीटं न देणे किंवा त्यांना पाडणं हे घडलं आहे.
- भाजपचे विधानसभा निवडणुकीत 105 जण निवडून आले, पण जर नीट नियोजन केलं असतं, तर भाजपचे आणखी आमदार निवडून आले असते.
- जनतेने महायुतीला मतदान केलं होतं. शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय होऊन चर्चा झाली असती, दोन पावलं मागे घेतली असती, तर महायुतीचाच मुख्यमंत्री झाला असता. शिवसेनेची एक-दोन वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी मान्यही केली असती, तरी चर्चेतून मार्ग निघू शकला असता.
- खालच्या माणसांना बोलण्यात अर्थ नाही. ज्यांनी हे निर्णय घेतले त्यांनाच दोष द्यावा लागेल. पक्ष यातील दोषी नसतो. पक्षाचं नेतृत्व करणारे जसं यशाचे भागिदार होतात, तसं त्यांनी अपयशाचे भागिदारही व्हावं. यश मिळालं तर माझ्यामुळे आणि अपयश मिळालं तर दुसऱ्यामुळे हे माझ्या 40 वर्षांच्या राजकीय जीवनात आम्ही कधी शिकलो नाही.
- आमच्यावेळी देखील अपयश आलं, त्याला आम्हीही तोंड दिलं आहे. त्यावेळी आम्ही ते अपयश मान्य केलं. त्यावेळी आम्ही पराभव मान्य करत अपयश स्विकारलं. तशी पराभवाची जबाबदारी घेतली गेली पाहिजे.
- पराभवाची जबाबदारी पक्ष म्हणून नाही तर ज्याने नेतृत्त्व केलं त्यांनी स्वीकारलं पाहिजे. आमच्या भागात आमचे आमदार पाडले असतील आणि तेथील जबाबदारी खडसेंकडे दिलेली असेल, तर त्याला खडसे जबाबदार आहेत.
- नाराजांची मोट बांधण्याची आवश्यकता नाही. पक्षातील जे नेते अस्वस्थ आणि नाराज आहेत ते आपोआपच एकत्र होतात.
- सरकार स्थापनेला आत्ता 8 दिवसच झाले आहेत. त्यामुळे आत्ताच सरकारचं किंवा विरोधी पक्षाचं मुुल्यमापन करता येणार नाही. त्यांना कामाची संधी दिली गेली पाहिजे. पुढच्या काळात कुणाचं काम चांगलं आहे, कुणाचं वाईट आहे याचं मुल्यमापन करता येईल.
- देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले त्यांचं अभिनंदन. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत त्यांचंही अभिनंदन. कोणत्याही सरकारचं किंवा विरोधकांचं कामकाज केवळ 8 दिवसात करता येणार नाही.