हैदराबाद : लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला जबरदस्त धक्का लागण्याची शक्यता आहे. तेलंगणात काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्ष पोचराम श्रीनिवास यांची भेट घेतली आहे. “आम्हाला तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस)मध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी,” अशी मागणी या 12 आमदारांनी केली आहे.
तेलंगणामध्ये डिसेंबर 2018 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी तेलंगणातील 119 जागांपैकी 88 जागांवर टीआरएसचे आमदार निवडून आले होते. त्या तुलनेत काँग्रेसला केवळ 19 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे विधानपरिषदेत काँग्रेसचे केवळ 19 आमदार होते. मात्र लोकसभा निवडणुकीत तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एन.उत्तम कुमार रेड्डी यांनी नालगोंडाच्या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला होता. तेलंगणातून हुजूरनगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.
Hyderabad: 12 Congress MLAs met Telangana Assembly Speaker, Pocharam Srinivas Reddy and gave him a representation to merge the Congress Legislature Party with the ruling Telangana Rashtra Samithi. pic.twitter.com/oex4TZpZ8i
— ANI (@ANI) June 6, 2019
या कारणामुळे काँग्रेसचे तेलंगणात फक्त 18 आमदार शिल्लक राहिले होते. मात्र या आमदारांपैकी 12 आमदारांनी आम्हाला टीआरएसमध्ये सहभागी व्हायचं असल्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यानुसार आज (6 जून) या 12 आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आम्हाला टीआरएसमध्ये पक्षामध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी या 12 आमदारांनी केली आहे.
दरम्यान काँग्रेसच्या आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी मान्य केल्यास, त्यांचे विधानपरिषदेत केवळ 6 आमदार उरतील. तसेच तेलंगणामध्ये काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागण्याची शक्यता आहे.