नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीएम हाऊसच्या नूतनीकरणावरून भाजप आक्रमक झाली आहे. भाजपने नूतनीकरण करण्यात येणाऱ्या सीएम हाऊसमधील पंखे, पडदे आणि इतर गोष्टींवर लाखो रुपये खर्च करण्यात आल्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. या गोष्टीवरून भाजपने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या बंगल्यावर निदर्शने केली. तर, आम आदमी पक्षाने भाजपला प्रत्युत्तर देत पुलवामा आणि अदानीसारख्या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी भाजपने हा मुद्दा उपस्थित करत असल्याची टीका केली आहे.
भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सीएम हाऊसच्या नूतनीकरणावर 45 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. केजरीवाल यांच्या घरासाठी आठ लाख रुपयांचे पडदे, 15 बाथरूम आहेत. इतका खर्च करण्याची खरंच गरज होती का ? असा सवाल भाजपने केला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अशी कोणती हवा हवी आहे त्यासाठी त्यांना लाखो रुपयांचा पंखा लागतो ? त्यांना असे काय लपवायचे आहे की ज्यासाठी त्यांना आठ लाखांचे पडदे विकत घ्यावे लागले. दिल्लीतील जनतेने आपच्या दाव्यांवर विश्वास ठेवला होता. परंतु, दिल्लीच्या जनतेची फसवणूक झाली आहे अशी टीका भाजपने केली.
परदेशी संगमरवरी बसविण्याचा अधिकार पीडब्ल्यूडी कलमानुसार देण्यात आला आहे. त्यामुळे हे कलम मागे घेण्यात यावे अशी मागणी करतानाच राजयोग आला की अनेकदा ‘राज रोग’ येतो, अशी म्हण आहे. पण, आम आदमी पक्षासंदर्भात हा ‘राज रोग’ इतक्या लवकर संक्रमित होईल याची अपेक्षा नव्हती असा टोलाही भाजपने लगावला आहे.
भाजपच्या हा हल्ल्याला ‘आप’नेही प्रत्युत्तर दिले आहे. पुलवामा आणि अदानीसारख्या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी भाजप हा मुद्दा उपस्थित करत असल्याचे आपने म्हटले आहे. दिल्लीतच पीएम हाऊस बांधण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च केले जात आहेत अशी टीका करतानाच ‘आप’ने भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या खर्चावरही निशाणा साधला आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी विमानावर 191 कोटी रुपये खर्च केले. त्याच वेळी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विमान खरेदीसाठी 65 कोटी दिले आहेत.
देशाचे पंतप्रधान 500 कोटी रुपये खर्चून नवीन घर बांधत आहेत. त्यांच्या सध्याच्या घराच्या नूतनीकरणावर 90 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. 20 हजार कोटी रुपयांच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची किंमत सुमारे 23 हजार कोटी रुपये झाली. यावरही भाजपने बोलावे अशी टीका आपने केली आहे.
भाजपच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह म्हणाले की, मुख्यमंत्री केजरीवाल राहतात ते सरकारी घर 1942 मध्ये बांधले होते. त्यांच्या घराचे छत तीन वेळा पडले. एका घटनेत केजरीवाल यांच्या आईवडिलांच्या खोलीचे छत कोसळले. दुसऱ्या घटनेत मुख्यमंत्र्यांच्या बेडरूमचे छत पडले. तिसऱ्या घटनेत केजरीवाल ज्या खोलीत लोकांना भेटायचे त्या खोलीचे छत पडले असे असताना नूतनीकरण करायचे नाही का असा सवाल त्यांनी केला.