मुंबई : प्रभादेवीत झालेल्या राजकीय राड्यानंतरची (Maharashtra Political Crisis) सगळ्यात मोठी बातमी हाती येते आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे (Santosh Telwane) यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संतोष तेलवणे यांनी दादर पोलीस स्थानकात याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार अखेर दादर पोलिसांनी (Dadar Police) गुन्हा दाखल केला आहे. एकूण 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे शिवसैनिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची चौकशी करुन पोलिसांनी त्यांना सोडून दिलं.
वेगवेगळ्या 9 कलमांतर्गत दादर पोलीस स्थानकात शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात संतोष तेलवणे यांनी दादर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, रात्री या राड्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे का? यबाबात अद्याप कोणताही माहिती मिळू शकलेली नाही.
संतोष तेलवणे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता संतोष तेलवणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. तसंच गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, शिंदे आणि शिवसेना या दोघांकडूनही स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या स्वागत कक्षावरुन एकमेकांना डिवचण्यात आलं होतं. एकमेकांविरोधात जोरादर घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री झालेल्या या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं होतं. शनिवारी मध्यरात्री शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता.
या मारहाण प्रकरणी संतोष तेलवणे यांनी दादर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. दरम्यान, शिवसेनेकडूनही परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दादर पोलिसांकडून आता या राजकीय राड्याप्रकरणी नेमकी पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार सर सरवणकर यांनी दादर पोलीस स्थानकात गोळीबार केला, असा सनसनाटी आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला आहे. तर सदा सरवणकर यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावलाय. घरगुती वादातून भांडण झालं, असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय.