मुंबई : देशभरात लोकसभा निकालाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. महाराष्ट्रातही 48 लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर काही वेळातच मतमोजणीचे कल येतील. मतदारसंघनिहाय कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर आहे हेही कळेल. मात्र, अंतिम निकाल समजण्यासाठी बरीच वाट पाहावी लागेल. मात्र, महाराष्ट्रातील 4 मतदारसंघांचा निकाल राज्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात अगोदर लागण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, कल्याण आणि रत्नागिरी-सिंधुदूर्ग या मतदारसंघांमध्ये सर्वात आधी निकाल लागेल असा अंदाज आहे. यामागे कारण आहे या मतदारसंघामधील मतदारांची संख्या आणि त्याच्या मोजणीसाठी लागणारा वेळ. दक्षिण मध्य मुंबईत 7 लाख 95 हजार 399 मतमोजणी करावी लागणार आहे. त्यामुळे राज्याचा विचार करता सर्वात आधी दक्षिण मध्य मुंबईचाच निकाल आपल्याला समजेल. त्यानंतर क्रमांक दक्षिण मुंबईचा क्रमांक लागतो. या मतदारसंघात 7 लाख 99 हजार 612 मतमोजणी आहे. दक्षिण मुंबईच्या खालोखाल कल्याण आणि नंतर रत्नागिरी-सिंधुदूर्गचा क्रमांक लागतो. कल्याणमध्ये 8 लाख 88 हजार 183 आणि रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये 8 लाख 97 हजार 249 मतांची मोजणी करणे अपेक्षित आहे.
मतमोजणी कशी होणार?
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या साधारण 18 ते 20 फेऱ्या होणार आहेत. एका फेरीसाठी साधारणपणे 30 मिनीटे लागतात. 1 फेरीची मतमोजणी झाल्यानंतर आणि त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्यानंतरच दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. EVM मधील मतांची मोजणी आणि VVPAT च्या मतांची मोजणी होणार असल्यास अशा स्थितीत प्रत्येक फेरीसाठी जवळपास 40 ते 45 मिनीटे लागतील. त्यामुळे निकाल घोषित होण्यास काहीसा विलंब होईल. सकाळी 7 वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत EVM यंत्रे मतमोजणीसाठी स्ट्राँग रुममधून बाहेर काढली जाणार आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी राहणार आहेत. यामध्ये एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे.
एका विधानसभा मतदारसंघातील 5 VVPAT मशिनची मते आणि प्रत्यक्ष EVM ची मते यांची पडताळणी करण्याचे निर्देश असल्याने यासाठी काहीसा अधिक कालावधी लागणार आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. VVPAT मते आणि प्रत्यक्ष EVM मते यात फरक आढळल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. त्यानंतर आयोग यावर अंतिम निर्णय घेईल. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 23 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. सर्वात अगोदर पोस्टल मतदानाची मोजणी होणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.