मुंबई: भाजपने लोकसभा निवडणूक 2019 साठी बिहारमध्ये जागावाटप करुन रणशिंग फुंकलं आहे. बिहारमध्ये भाजपने एक पाऊल मागे घेत जिंकलेल्या 22 पैकी केवळ 17 जागाच लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर आता महाराष्ट्रात भाजप शिवसेनेसोबत कोणता फॉर्म्युला अवलंबणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एकीकडे भाजप शिवसेनेसोबत युती करण्यासाठी आग्रही आहे, तर दुसरीकडे शिवसेनेने एकला चलो रेचा नारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती होते की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र द क्विंटने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेना-भाजपमध्ये 5 फारम्युल्यांवर चर्चा सुरु आहे.
फॉर्म्युला नंबर 1 – 155 जागा
शिवसेनेच्या मते, भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका सोबतच घ्याव्या. तसंच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 288 पैकी 155 जागा द्याव्या, तरच भाजपसोबत युती होऊ शकते.
फॉर्म्युला नंबर 2 – मुख्यमंत्रीपद
शिवसेना सूत्रांच्या मते, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 50-50 चा फॉर्म्युला असावा. विधानसभेच्या 288 पैकी 144 शिवसेनेने तर भाजपनेही 144 जागा लढवाव्या. मात्र मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील.
फॉर्म्युला नंबर 3 –
भाजप 50-50 च्या फॉर्म्युलाबाबत तयार आहे, मात्र मुख्यमंत्रीपदाबाबत कोणत्याही समझोत्याला तयार नाहीत.
फॉर्म्युला नंबर 4 –
शिवसेना विधानसभेच्या 151 जागा, तर भाजप 137 जागांवर निवडणूक लढवेल. ज्यांचे आमदार जास्त, त्यांचा मुख्यमंत्री होईल.
फॉर्म्युला नंबर पाच
दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवेल. सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रीपदही अडीच अडीच वर्ष असेल. म्हणजे भाजप अडीच आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षांसाठी असेल.
हे पाच फॉर्म्युले सध्या चर्चेत आहेत. दोन्ही पक्ष यापैकी कोणता फॉरम्युला स्वीकारणार हे येत्या काळात समजेल. मात्र सध्या शिवसेनेचा पवित्रा आणि पाच राज्यातील निवडणुकांतील भाजपची स्थिती पाहता, वादाची ही गाठ सहजासहजी सुटेल असं वाटत नाही.
वाचा: लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजप 5 जागा हरली!
भाजपचा सर्व्हे
दरम्यान, यापूर्वी भाजपने केलेल्या गुप्त सर्व्हेचे आकडे समोर आले आहेत. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची युती झाली नाही, तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसेल, असं या सर्व्हेतून समोर आलं आहे.
भाजपचा सध्याचा अंतर्गत सर्व्हे
भाजपने नुकत्याच केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, लोकसभेसाठी शिवसेना-भाजपने युती केल्यास त्यांना 30 ते 34 जागा मिळू शकतात. मात्र जर दोन्ही पक्ष स्वतंत्र लढल्यास भाजप 15 ते 18 आणि शिवसेना केवळ 5 ते 8 जागा जिंकेल. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला 22 ते 28 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
लोकसभा 2014 चा निकाल
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांपैकी शिवसेना-भाजप युतीने तब्बल 41 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये शिवसेनेने 18 आणि भाजपने तब्बल 22 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला केवळ 2 तर राष्ट्रवादीला 4 जागा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली होती.
संबंधित बातम्या
भाजपच्या गुप्त सर्व्हेचे आकडे उघड, शिवसेनेसोबतच्या युतीसाठी धडपड
लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजप 5 जागा हरली!
त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!