गिरीश गायकवाड, ठाणेः स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत (Veer Savarkar) अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा (Crime filed Against Rahul Gandhi) दाखल करण्यात आला आहे . राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा आरोप राहुल गांधींवर करण्यात आला आहे.
याविरोधात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाणे नगर पोलीस स्थानकात राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला आहे. बाळासाहेबांची शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे गटानेदेखील यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे.
राहुल गांधी यांच्या या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने ठाण्यात निषेध मोर्चाही काढला. पोलिसांनी राहूल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनीही केली होती. त्यानंतर संध्याकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत पोलीस नक्की काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. यात्रेदरम्यान, अकोल आणि वाशिम येथे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. सावरकर यांनी ब्रिटिशांची पेंशन घेतली. बिटिशांसाठी त्यांनी काम केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
पोलिसांनी राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी कालच भाजपतर्फे करण्यात आली. राहुल गांधींनी या वक्तव्यासाठी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
आज राहुल गांधी यांच्या शेगाव येथील सभेत मनसे, भाजपतर्फे राहुल गांधी यांचा निषेध केला जाणार आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.