शिर्डी | 14 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणूका केव्हाही घोषीत होऊ शकतात. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. अनेक पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची घोषणा देखील सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपासंदर्भात महाविकास आघाडीचे अनेक जागांवर एकमत झाले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शिर्डी लोकसभेच्या जागेवर अद्यापही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. कधी काळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी लोकसभेच्या जागेवरून उध्वव बाळासाहेब ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीचे पडघम केव्हाही वाजतील अशी स्थिती आहे. महायुतीच्या विरोधात कॉंग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीचे लोकसभेच्या 48 जागांवर बोलणी जवळपास झाली असून अनेक जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र नगर येथील शिर्डी लोकसभा जागा अद्याप कोणाला सोडायची हे निश्चित झालेले नाही. या जागेवरुन कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात समेट झालेला नसल्याचे म्हटले जात आहे. कॉंग्रेसचा शिर्डी एकेकाळी बालेकिल्ला होता. आता शिर्डीतून कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन दोन्ही पक्षांत बोलणी सुरु आहेत.
उध्दव ठाकरे 13 आणि 14 फेब्रुवारी अशा दोन दिवसांच्या शिर्डी लोकसभा मतारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही गटाकडून शिर्डीच्या उमेदवारीवर दावा केला जात आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. तरी देखील ठाकरे गटाने शिर्डीच्या जागेवर दावा कायम ठेवला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करीत लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. उमेदवारी निश्चित मानून वाकचौरे गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. 2009 साली वाकचौरे यांनी शिर्डी मतदासंघांत रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यामुळे जनता पुन्हा माझ्यामागे उभी राहिल असा विश्वास भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस देखील गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवित आली आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र असले तरी काँग्रेसने देखील शिर्डी लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. काँग्रेसच्या निष्ठावान आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यादेखील गेल्या काही दिवसांपासून शिर्डी लोकसभे अंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढीत आहेत. घरोघरी जाऊन उत्कर्षा रूपवते नागरिकांशी संवाद साधत असून काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानून त्या कामाला लागल्या आहेत. जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी शिर्डी लोकसभेत काँग्रेसला अनुकूल वातावरण असून आम्ही या जागेसाठी आग्रही असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.