मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीच्या आधी आपल्याला तुरुंगात टाकण्याचा डाव असल्याचं खडसेंचं म्हणणं आहे. खडसेंनी आपल्याला तुरुंगात टाकण्याचा डाव आहे असं म्हटल्यानंतर जळगावात दूध संघाची चर्चा सुरु झाली आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे चेअरमन होत्या. मात्र, सत्तांतर होताच संचालक मंडळच बरखास्त करुन चौकशी समितीही नियुक्त केली तसंच दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
जिल्हा दूध संघाचा 10 कोटींचा निधी शासनाची परवानगी न घेता संचालक मंडळानं खर्च केल्याचा आरोप आहे. तसंच मंदाकिनी खडसेंसह 11जणांवर प्रशासक मंडळानं तक्रार दाखल केली आहे.
मंत्री गुलाबराव पाटलांनीही याचेच संकेत दिले आहेत. मधल्या काळात एकनाथ खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता.
आपण फडणवीसांचीही भेट घेणार असल्याचं खडसे म्हणाले होते. गिरीश महाजन यांनी खडसेंबाबत एक गौप्यस्फोटही केला होता. एकीकडे खडसे सरकारवर आरोप करत आहे. स्थानिक पातळीवरही त्यांना संघर्ष करावा लागतोय.
2024 च्या निवडणुकांसाठी आता जेमतेम दीड वर्ष उरलंय. मागच्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंचा पराभव झाला होता. या पराभवाचे उट्टे खडसेंना काढायचे आहेत.
मुक्ताईनगर जिंकण्यासाठी दोन्ही बाजूंनी आत्तापासूनच जोरदार फिल्डिंग लावलीय. सध्या सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप हा त्याचाच एक भाग आहे.