मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार (MVA) स्थापन केलं आहे. सरकार स्थापनेला दोन वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पर्यटन विकासमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यातील ट्युनिंग विधिमंडळात दिसून आलेलं आहे. विधानसभेत अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना सावरून घेतलं होतं. मुंबई महापालिका भेटीत देखील अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. आज मुंबईच्या रस्त्यावर या पुढील चित्र पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे आणि आजित पवार एकाच गाडीने प्रवास करत असल्याचं दिसून आलं आहे. आदित्य ठाकरे स्वत: गाडी चालवत असल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी बारामतीमध्ये अजित पवार यांनी गाडीचं सारथ्य केलं होतं तर, उद्धव ठाकरे त्यावेळी बाजूला बसले होते. आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात येत आहे. महालक्ष्मी, रेसकोर्स वरळी , धोबी तलावंची पाहणी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरराष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीक वाढल्याचं या निमित्तानं दिसून येत आहे. आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी पहाटेपासूनच मुंबईतल्या विविध विकास कामांची पाहणी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्याच्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आजचा पाहणी दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यातील सरकार पडणार असल्याच्या चर्चा वारंवार केल्या जातात मात्र आजचं चित्र पाहून त्यावर देखील पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे.
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. कृषी विज्ञान केंद्राचं कार्यालय पाहून झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अजित पवार ड्रायव्हिंगला बसलेल्या कारमध्ये बसले होते. त्यानंतर फोटोसेशन झालं. तेव्हा, आमच्या सरकारचं ड्रायव्हिंग अजितदादांकडे आहे, असं उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले होते.
‘स्टेपनी’च्या हाती ‘स्टिअरिंग’, बारामतीत उद्धव ठाकरेंचं सारथ्य अजितदादांकडे
गेल्या वर्षी मुंबई महापालिकेच्या हेरिटेज वॉकची सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार यांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं होतं. “मुंबई महापालिकेत याआधी येण्याची संधी मिळाली नव्हती. ही संधी आदित्य ठाकरेंमुळे मिळाली आणि इथे येता आलं. कधी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Chahal) यांना वाटलं नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना ही इमारत दाखवावी. मी हे लक्षात ठेवेन. शेवटी माझ्या लेकालाच वाटलं मला इथे आणावं”, अशी भावना अजित पवार यांनी व्यक्त होती.
इक्बाल चहल मी लक्षात ठेवेन, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं’ : अजित पवार