अहमदनगर: युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावलाय. काही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहितीच नसल्याचं म्हणत ठाकरेंनी थोरातांना लक्ष्य केलं. बाळासाहेब थोरातांनी जन आशीर्वाद यात्रेवर मिश्किल टीका करत आदित्य ठाकरे कॉलेजच्या वयाचे असल्याचं म्हटलं होतं. त्यावर जनआशीर्वाद यात्रा अहमदनगरला आली असताना ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं.
माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे. मात्र काही नेत्यांना राज्यातील तरुणांची माहिती नाही.
– आदित्य ठाकरे
यावेळी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री कोण होणार यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मुख्यमंत्री कोण होईल हे माहित नाही. मात्र, संपूर्ण महाराष्ट्र भगवा होईल.
आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेतील पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संवाद साधत आहेत. अहमदनगर येथील ढोकी येथे संवाद साधत असताना त्यांनी मुख्यमंत्री कोणाला बनवायचं यासाठी जन आशीर्वाद यात्रा नाही. तर शेतकरी, धनगर, विद्यार्थी, महिला यांच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी ही यात्रा असल्याचं सांगितलं. आम्ही निवडणुकीच्या आधीच्या युतीमध्ये पहिली अट शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची ठेवल्याचंही सांगितलं.