मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya thackeray worli constituency gujrati poster) यांनी नुकतेच निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या प्रचारालाही सुरुवात झाली. वरळीतील प्रत्येक चौकात ‘नमस्ते वरळी’ असे पोस्टर लावलेले आहेत. तर वरळी नाक्यावर ‘केम छो वरळी’ असं गुजराती भाषेतील पोस्टर (Aaditya thackeray worli constituency gujrati poster) लावण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र खरच हे पोस्टर लावले की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
शिवसेना या पोस्टरच्या माध्यमातून गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी चर्चाही केली जात आहे. त्यासोबतच वरळीतील इतर भाषिक मतदारांनाही शिवसेनेकडून आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटलं जात आहे. मराठी माणासाच्या न्याय, हक्कांसाठी लढणारी सेना म्हणजे शिवसेना, अशी शिवसेनेची ओळख आहे. पण गुजराती भाषेत लावलेल्या या पोस्टरचा फोटो व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेवर जोरदार टीका केली जात आहे.
सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात आदित्य ठाकरे यांना ट्रोल केले जात आहे. केम छो वरळी या पोस्टरचे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी या गुजराती पोस्टरवरुन शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना टार्गेट केले.
लोकसभेला शिवसेनेने दक्षिण मुंबई मतदारसंघात केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा प्रचार करताना वरळी, भायखळा, लालबाग, चिंचपोकळी विभागात ‘मी मराठी माझा खासदार मराठी’ असा प्रचार केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आदित्य ठाकेरेंच्या गुजराती पोस्टरचे फोटो व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेच्या प्रचारावरही अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
दरम्यान, 3 किंवा 4 ऑक्टोबर रोजी आदित्य ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी निवडून येण्यासाठी वरळीतून शिवसैनिकांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. यापूर्वी वरळीत शिवसेना आमदार सुनील शिंदे होते. मात्र ही जागा आता आदित्य ठाकरे यांना देण्यात आली आहे.