नाशिक : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. जळगाव, धुळेनंतर ही यात्रा आज नाशिकमध्ये दाखल झाली. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये उपस्थितांना संबोधित केलं.
आदित्य ठाकरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मतं तीन टक्क्यांनी वाढली आहेत. आम्ही दिलेली वचनं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण याप्रमाणे पाळत आहोत”
मी आश्रम शाळेत, आधार केंद्रात गेलो होतो तिथं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं भेटली. त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. विरोधकांची मनं जिंकायची आहेत. ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही, त्यांचे आशीर्वाद कामं करून मिळवायचे आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
भाषणादरम्यान शेतकरी ओरडला
आदित्य ठाकरे यांचं भाषण सुरु असताना एका शेतकऱ्याने ओरडून सांगितले की आमच्या गावात आरोग्य केंद्र-दवाखाना नाही. त्यावर आदित्य ठाकरेंनी तुमच्या गावात आठ दिवसात दवाखाना सुरु करु असं आश्वासन दिले. आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यात आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसात त्या गावात आरोग्य केंद्र उभं राहतं का हे पाहावं लागेल.
‘मालेगावातून बिनविरोध निवडून आणू’
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेवर निघाले आहेत. या जन आशीर्वाद यात्रेमुळे आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला पुष्टी जोडत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांनी मालेगाव विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. मालेगाव विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना बिनविरोध निवडून आणू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जर मालेगाव विधानसभा मतदारसंघात लढले तर आदित्य ठाकरे यांना एक लाख मतांनी निवडून आणू शकतो असा दावा ही दादा भुसे यांनी केला आहे.