मुंबई: शिवसेना नेते (shivsena) आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर शरसंधान साधलं आहे. हे शरसंधान साधताना शिंदे गटातील 40 आमदारांना आव्हानही दिलं आहे. मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे. पण आधी 40 आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी अटही आदित्य यांनी ठेवली आहे. तुम्ही राजीनामा द्या, मीही देतो. सर्व मिळून निवडणुका लढू. जनतेच्या दरबारातच दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच ही अट ठेवल्याने आता शिंदे गट (shinde camp) त्याला कसे उत्तर देतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 40 वर्षात आम्ही गद्दारांना खूप काही दिलं. आमच्याच पाठीत गद्दारांनी खंजीर खुपसला. आम्हाला शिव्या द्या. मंत्रीपद मिळतील आमदारांना असं त्यांना सांगण्यात आलं. आजही ते स्वत:च विचार करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं. एका मंत्रिपदासाठी गद्दांरांना काय काय करावं लागतं. गद्दारांची मला कीव येते, अशी टीका करतानाच शिवसेनेला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या काळात शिवेसना पुन्हा उभारी घेईल, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
शिंदे गटाचे आमदार दिलेल्या स्क्रिप्टनुसार बोलत आहेत. त्यांच्यातील अनेकांना दिल्लीपर्यंत जावं लागतयं. आता तर गल्लीतील लहान लहान मुलांनाही 50 खोके माहीत झाले आहेत. या मंत्र्यांचा काहीच अभ्यास नाही. ते सभागृहात उघडे पडत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
महापालिकेच्या घोटाळ्याच्या चौकशीवरूनही त्यांनी सरकारला प्रत्युत्तर दिलं. मुंबई महापालिकेची चौकशी होऊ दे आमच्या चांगल्या कामाचं मार्केटींग समोर येईल, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीवरून शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मुंबई महापालिकेची कॅग मार्फत चौकशी करण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. मुंबई महापालिकेच्या चौकशी जरूर करा. पण पिपंरी चिंचवडसह इतर महापालिकांचीही चौकशी करा. मुंबई महापालिकेला का बदनाम केलं जात आहे? मुंबई महानगरपालिकेचं नाव देशात आहे. मुंबई महापालिकेचं चांगलं काम लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.