दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये (AAP) आम आदमी पार्टीने नागरिकांना मुलभूत सोई-सुविधा तर दिल्या आहेतच पण शिक्षण क्षेत्रावरही भर दिला आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार आहे. मात्र, (BJP Party) भाजप आणि आम आदमी पक्षातील शाब्दिक चकमक ही संपण्याचे नाव घेत नाही. आता शाळा उभारणीवरुन राजकारण सुरु आहे. आम आदमी पार्टाने दिल्लीमध्ये उभारलेल्या (School) शाळा आणि भाजपाच्या एमसीडीतील शाळा यावरुन मतभेद होत आहे. आम आदमी पार्टीचे आमदार हे एमसीडीच्या शाळा पाहणार असल्याची माहिती भाजपला मिळताच त्यांनी सर्व शाळांना कुलूप ठोकले. एवढेच नाही तर या शाळांमध्ये कुणालाही प्रवेश देऊ नये अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना तर दिल्या आहेतच पण वेळप्रसंगी याकरिता पोलिसांचीही मदत घ्या असेही सांगितले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचे आमदार दुर्गेश पाठक यांनी भाजपाला खुले आव्हान दिले असून भाजपाने एक जरी शाळा चांगली उभारली असली तर ती दाखवावी असे म्हटले आहे. यावरुन आम आदमी आणि भाजप यांच्या मतभेद हे टोकाला गेले आहेत.
दिल्लीमधील प्रमुख पक्ष असलेले आम आदमी पार्टी आणि भाजपामध्ये कायम मतभेद असल्याचे पाहवयास मिळाले आहे. आप ने गेल्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. असे असतानाच आ. दुर्गेश पाठक यांनी भाजपाला आव्हान देऊन त्यांनी एमसीडीच्या अंतर्गत एक जरी चांगली शाळा उभारली असली तर ती दाखवावी असे आव्हान दिले होते. यावरुन आपचे आव्हान स्विकारण्यापेक्षा भाजपाने ते लपवून ठेवण्यासाठी केलेली खटाटोप आ. पाठक यांनी समोर आणली आहे. आपचे आमदार एमसीडीच्या शाळेपर्यंत पोहचू नयेत यासाठी भाजपाने काय ‘शाळा’ केली हेच त्यांनी सांगितले आहे.
आम आदमी पार्टीच्या आमदारांकडून एमसीडीच्या शाळांची पाहणी होणार असल्याची माहिती मिळताच भाजपाने या आमदारांना शाळेत प्रवेश मिळूच नये यासाठी फिल्डिंग लावली होती. अनेक शाळा ह्या कुलूप बंद ठेवल्या होत्या तर भाजपाचे नेते अधिकाऱ्यांना वारंवार फोन करुन शाळेमध्ये कुणालाही प्रवेश देऊ नका असे सांगत होते. केवळ आपच्या आमदारांनाच नाहीतर माध्यम प्रतिनीधींनाही प्रवेश नव्हता. प्रवेश तर लांबच पण याबाबत कोणी त्रास दिला तर थेट पोलिसांमध्ये संपर्क करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
भाजपाने एमसीडीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचना आणि येथील एका शाळेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने भाजपाने असे का केले याचे उत्तर मिळाल्याचे आ. दुर्गेश पाठक यांनी सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये शाळेचे खरे रुप समोर आले आहे. वर्गामध्ये मुले तर अभ्यास करीत होते पण शाळेच्या भिंतींची पडझड झाली होती शिवाय या भिंतीवरच झाडेही उगवली गेली होती. शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य हे सर्व समोर येऊ नये म्हणून भाजपाचा खटाटोप असल्याचे पाठक यांनी सांगितले. पण सत्य हे अधिक काळ लपून राहत नसल्याचे म्हणत त्यांनी भाजपाला टोलाही लगावला आहे.
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार असले तरी येथील एमसीडी अर्थात दिल्ली महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आहे. एकीकडे आम आदमी पार्टीने राज्यभर चांगल्या शाळांचे जाळे उभारले आहे तर दुसरीकडे दिल्ली महापालिकेअंतर्गत शाळांची काय अवस्था आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टीच्या वतीने केला जात आहे.