मुंबई : गेला सव्वा महिन्यापासून राज्याला ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expansion) प्रतीक्षा लागली होती. तो मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडलाय. एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि भाजपकडून (BJP) तब्बल 18 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावर विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आलीय. यात पहिला मुद्दा चर्चेत राहिला तो म्हणजे महिलांचा मंत्रिमंडळात समावेश नसल्याचा आणि दुसऱ्या एका मुद्द्यावरून टीका होऊ लागली ती म्हणजे आरोप असणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मंत्री संजय राठोड यांना आरोपामुळे गेल्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावं लागलं होतं. त्यांना या मंत्रिमंडळात सुद्धा संधी देण्यात आलेली आहे. यावरून आरोप होत असतानाच मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जवळच्या लोकांवरती टीईटी घोटाळ्यात हात असल्याचा आरोप असताना आणि हे प्रकरण तपासत असताना अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळाल्यानेही विरोधकांकडून सडकून टीका होती. मात्र या टीकेला अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलंय.
मी डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन यांच्या माहितीचं पत्र दिलं, शिक्षण विभागाचे पत्र दिलं. हे सर्व असल्यानंतर आरोपांमध्ये कोणतेही सत्यता उरत नाही. हे आरोपांमध्ये सत्यता असती तर आम्हाला अडचण आली अस.ती सध्या या प्रकरणी ईडी तपास करत आहे. आमच्या परिवाराने त्याचा उपयोग करून घेतला असेल आणि जर आमच्याकडे कागद असतील तर त्याची चौकशी करायला हवी. त्यासाठी मीच मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली, अशी माहिती सत्तार यांनी दिली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने सांगितले की पगार बंद करता येणार नाहीत. पण आमच्या लोकांचे पगार बंद झाले आहेत. मात्र या प्रकरणात आमचा कसलाही संबंध नाही, ज्यांनी हे खेळ केला आहे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी अब्दुल सत्तार यांनीच केलीय.
तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. कोणताही मंत्री किंवा आमदार सध्या नाराज नाही, हा अंतिम मंत्रिमंडळ विस्तार नाही. 23 ते 24 मंत्र्यांचा आणखी विस्तार होणार आहे. त्यात अनेकांना संधी मिळेल. आजचा जो विस्तार झाला आहे तो मुख्यमंत्र्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन केलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांनाही संधी मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.