योगेश बोरसे, पुणेः कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना थेट शिवीगाळ केली. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. काल दुपारपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलन करतायत. विविध नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. मात्र 24 तास उलटूनही अजित पवार (Ajit Pawar) यांची काहीच प्रतिक्रिया नाही? हे मौन महाराष्ट्राला अस्वस्थ करणारं आहे. फक्त सुप्रिया सुळेंचे (Supriya Sule) दादा म्हणूनच नव्हे तर राज्यातील सक्रिय विरोधी पक्षनेते पद असूनही अजित पवार एवढा वेळ शांत का आहेत, हा प्रश्न अनेक चर्चांना खतपाणी घालतोय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार सध्या मुंबईत आहेत. जयंत पाटील म्हणतात, आजोळी आहेत. मात्र अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना शिवी दिल्यावरून त्यांची एकही प्रतिक्रिया का आली नाही? विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून शांत आहेत. त्यांच्या मनात काही वेगळेच विचार सुरु आहेत का?
एवढंच नाही तर शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय मंथन शिबिरातही अजित पवार यांची गैरहजेरी राज्याचं लक्ष वेधणारी ठरली. ती अधिक ठसली तरी शरद पवारांच्या उपस्थितीमुळे. 81 वर्षांचे शरद पवार. न्यूमोनिया झाला असतानाही रुग्णालयातून उठून निघाले. हेलिकॉप्टरने शिर्डी येथे पोहोचले. कधी नव्हे ते फक्त पाचच मिनिटं कार्यकर्त्यांना संबोधित केलं आणि परत मुंबईत रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड आहे. अजित पवार अस्वस्थ आहेत, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यामुळेच तर हाताला सलाइनसाठीचं बँडेज घेऊन शरद पवार राष्ट्रवादीच्या शिबीरात पोहोचले. पक्षात सर्वकाही आलबेल आहे, असं दाखवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला गेला.
अजित पवार यांचा आधीपासूनच दुसरा कार्यक्रम ठरला होता, असं सांगून जयंत पाटील यांनी त्या शिबिरावेळी सारवासारव केली. अन् अब्दुल सत्तार यांच्याबाबतही अजित पवार का बोलत नाहीयेत, असा प्रश्न विचारला असता इथेही असंच उत्तर आलं. अजित पवार सध्या आजोळच्या कार्यक्रमासाठी गेले आहेत. परत आल्यावर ते योग्य उत्तर देतील, असं जयंत पाटील म्हणालेत.
सुप्रिया ताई त्यांच्या बहीण आहेत. बहिणीबाबत असे शब्द वापरल्यावर सर्व कुटुंबातच नाराजी आहे. पक्ष म्हणून पक्षाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्याकडून आम्ही भूमिका मांडतोय, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, भाजपाला तरी त्यांचं हे वक्तव्य पचनी पडतंय का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय. सत्तार यांना ताबडतोब बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर सरकार विरोधी सर्व संघटनांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केलाय. सर्वसामान्यांचे कान आणि डोळे नेत्यांच्या घसरत्या थराच्या वक्तव्यांनी त्रस्त आहेत. अब्दुल सत्तार यांनी त्याचं टोक गाठलं असताना अजित पवार मात्र अलिप्त आहेत.
जयंत पाटील यांचं खरं मानलं. अजितदादा वैयक्तिक कार्यक्रमात बिझी आहेत. मग एवढ्या बिझी शेड्यूलमध्येही ट्विटरद्वारे तत्काळ भूमिका मांडणारे अजित पवार या प्लॅटफॉर्मवर तरी का गप्प आहेत?
मनसे नेते संदीप देशपांडेंनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटचीही वारंवार आठवण करून दिली जातेय. शरद पवार रुग्णलयातून उठून येतात अन् अजित पवार गैरहजर राहतात. गुवाहटीच्या वाटेकडे लक्ष ठेवा, कुछ तो गडबड है… असं वक्तव्य देशपांडेंनी ट्विटरद्वारे केलं होतं. अजित पवारांचं मौन आणि या चर्चा काही बिंदू जुळतात का?