नाशिक : ज्या गुवाहाटीतून राज्यातील सत्तांतराची रणनिती आखली गेली त्याच गुवाहाटीत शिंदेगट पुन्हा जातोय. कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , मंत्रिमंडळातील इतर मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जात आहेत. पण या गुवाहाटी दौऱ्यात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांसोबत असणार नाहीत. ते सध्या नाशकात आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावर सत्तार (Abdul Sattar) यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.
एकनाथ शिंदे आणि माझ्या संबंधांमध्ये कुठलाही दुरावा नाही. मी कुणावरही नाराज नाही. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. इथं माझी काही कामं असल्याने मी थांबलोय, असं स्पष्टीकरण सत्तार यांनी दिलंय.
नाशिकमध्ये कृषी प्रदर्शन होतंय. यात कृषीमंत्री सत्तार सहभागी झालेत. त्यामुळे गुवाहाटीला गेलो नसल्याचं सत्तार यांनी सांगितलं आहे.
मी सर्वधर्म समभाव मानतो. मी दर्गा, मस्जिद, मंदीर, गुरुद्वारा अशा सर्व धर्मस्थळांना एकसारखं मानतो. तिथं जात दर्शन घेतो. कामाख्या देवीच्या दर्शनालाही मी जाईल. आज गेलो तर देवी आशिर्वाद देईल, असं नाही. त्यामुळे मी कधी ना कधी दर्शनासाठी जाईल, असं सत्तार म्हणालेत.
शिंदेगटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर मित्रपक्ष भाजपकडून कौतुक होतंय. तर विरोधकांकडून कडाडून विरोध होतोय. भाजप नेते मोहित कंबोज यांनी यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. चलो गुवाहाटी! जय माँ कामाख्या देवी!, असं कंबोज म्हणालेत.
चलो गुवाहाटी !
जय माँ कामाख्या देवी !— Mohit Kamboj Bharatiya – मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) November 26, 2022
ठाकरेगटाकडून टीका करण्यात आली आहे.शिंदे गटाचं हिंदुत्व लोकांना आणि गुवाहाटीच्या कामाख्या देवीलाही मान्य नाही. त्यामुळे गुवाहाटीवरून परतताच शिंदे-फडणवीस सरकार पडणार, असा दावा शिवसेना ठाकरेगटाचे नेते, युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी केला आहे.