नाशिक : किमान त्या खुर्ची वर बसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा, असं मी म्हणालो होतो. रश्मी वहिनींना (Rashmi Thackeray) मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी ठेवला होता. कारण अडीच वर्षात काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसले. मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय दिसणार?, असं म्हणत कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
ठाकरे घरणाच्या दुसऱ्या व्यक्तीला मुख्यमंत् करावं असं माझं मत होतं. मी मला मुख्यमंत्री करा म्हणालो नव्हतो, तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत बोललेलो. त्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांनाही मान्य असायला हवं होतं, असं सत्तार म्हणालेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री, आमदार पुन्हा गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. पण या गुवाहाटी दौऱ्यात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांसोबत असणार नाहीत. ते सध्या नाशकात आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यावर सत्तार यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.एकनाथ शिंदे आणि माझ्या संबंधांमध्ये कुठलाही दुरावा नाही. मी कुणावरही नाराज नाही. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. इथं माझी काही कामं असल्याने मी थांबलोय, असं स्पष्टीकरण सत्तार यांनी दिलंय.
नाशिकचा माझा ठरलेला कार्यक्रम होता म्हणून गुवाहाटीला गेलो नाही. कुठेही विसंवाद नाही. सगळं चांगलं चाललं आहे, असं सत्तार म्हणालेत.