दत्ता कनवटे, औरंगाबादः औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे आज मंत्री संदीपान भूमरे (Sandipan Bhumre) आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा सत्कार समारंभ झाला. यावेळी जिल्ह्यातील मंत्री आणि नेत्यांची एकापेक्षा एक भाषणं ऐकायला मिळाली. अब्दुल सत्तारांचं भाषण अधिक चर्चेत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी बहुधा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) कुणाशी बोलत असावे. सत्तार यांनी भर भाषणातच त्यांना सुनावलं…
सत्तार म्हणाले, सतीश चव्हाण तुम्ही शांत रहा. आमचं पण भाषण ऐका. तुम्ही अशी खुसफुस करता, मग लोकांना वाटतं…. शंका येते… गेला… चाल्ला… मला त्यांना शंकेत टाकायचं नाही म्हणून मी क्लॅरिफिकेशन दिलं… असं वक्तव्य सत्तार यांनी केलं. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आज बँका अडचणीत असताना केंद्र आणि राज्य सरकारनं बॅलेन्स करत काही उपाय योजना केल्या तर बँका अडचणीत येणार नाहीत… असं वक्तव्य सत्तार यांनी केलंय. अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही सत्तार यांनी केली.
याविषयी हा प्रश्न अजित पवारांसमोर मांडला होता. तेव्हा ते म्हणाले, यासाठी अर्धी तिजोरी द्यावी लागेल. पण आता अर्धी तिजोरीवाले (डॉ. कराड) आपल्यासोबत आहेत… त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका… असं वक्तव्य सत्तार यांनी केलं.
सत्तार यांनी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख करतानाही खुमासदार वक्तव्य केलं. त्यांच्या वतीने मी इथे बोलतो. मी सिल्लोड, भूमरे पैठण…आमच्यामध्ये दानवे पाटलांचं भोकरदन येतं…. त्यामुळे त्यांना नितीन पाटील यांनी गैरहजर का ठेवलं, माहिती नाही… भाजपच्या डॉ. कराड साहेबांना बोलावलं. पण ते साधे सरळ आहे. हात दाखवा, गाडी थांबवा… आमची गाडी मात्र सुसाट असते… असं वक्तव्य करत सत्तार यांनी दानवेंची आठवण काढली.