औरंगाबाद/मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar Shiv Sena) हे भाजप म्हणता म्हणता आता शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत अब्दुल सत्तार (Abdul Sattar Shiv Sena) यांनी शिवबंधन बांधलं. सत्तार हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला कट्टर विरोध केल्यामुळे, त्यांना आता शिवसेनेत प्रवेश करावा लागत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना सिल्लोडची उमेदवारीही जाहीर केली.
शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या भूमिकांमुळे मी सेनेत प्रवेश करत आहे. माझ्यावर जी जबाबदारी सोपवली जाईल ती मी प्रामाणिकपणे पूर्ण करेन, आधी उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेईन, मग सभागृहात जाईन. सिल्लोडची जागा सर्वाधिक मताधिक्याने जिंकून येईल, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरुन अब्दुल सत्तार यांचं काँग्रेससोबत बिनसलं. त्यानंतर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते. भाजपच्या महाजनादेश यात्रेतही मुख्यमंत्र्यांच्या रथावर अब्दुल सत्तार पाहायला मिळाले.
दरम्यान, दोन महिन्यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकरही उपस्थित होते. अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. फक्त दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली होती.
अब्दुल सत्तार काँग्रेसवर नाराज
दरम्यान, अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे औरंगाबदमधील सिल्लोड मतदारसंघातील आमदार आहेत. मात्र, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विधान परिषद आमदार सुभाष झांबड यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर, अब्दुल सत्तार नाराज झाले आणि त्यांनी थेट काँग्रेसविरोधात बंड पुकारलं. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली.
यानंतर सत्तार यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या. काही दिवसांपूर्वीच अब्दुल सत्तार यांनी जालन्यात जाऊन रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत 10 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी जालन्यात सांगितले होते. मात्र स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता.
कोण आहेत अब्दुल सत्तार?
अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत.
गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली.
सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.
संबंधित बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावरुन भाजप कार्यकर्ते आणि अब्दुल सत्तार यांच्यात जुंपली
अब्दुल सत्तार ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंसोबत अर्धा तास चर्चा
अब्दुल सत्तार पक्षात नको म्हणजे नकोच, भाजप कार्यकर्ते दानवेंच्या भेटीला
कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाबाबत पक्षाची वेट अॅण्ड वॉचची भूमिका