हे तर मुंगेरीलाल के सपने… विरोधकांचे गुडघ्याला बाशिंग, सरकार पडण्याच्या चर्चा, अब्दुल सत्तार काय म्हणतात?

| Updated on: Nov 04, 2022 | 3:53 PM

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनानंतर सरकार कोसळणार असल्याचं भाकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय.

हे तर मुंगेरीलाल के सपने... विरोधकांचे गुडघ्याला बाशिंग, सरकार पडण्याच्या चर्चा, अब्दुल सत्तार काय म्हणतात?
Image Credit source: social media
Follow us on

सोलापूरः विरोधी पक्षामधील नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. काही स्वप्न हे मुंगेरीलाल सारखे असतात, असा टोला अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप यांच्या महायुतीचे सरकार काही दिवसात कोसळेल. शिंदे गटातील आमदार नाराज आहेत, अस्वस्थ आहेत, अशी भाकितं राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांकडून करण्यात येत आहेत. यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया नैराश्यातून येतायत, असं वक्तव्य अब्दुल सत्तारांनी केलंय.

टीव्ही9 वर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार म्हणाले, ‘ हे मुंगेरीलाल चे सपने काही असतात विरोधी पक्षामध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, असं वक्तव्य अब्दुल सत्तारांनी केलं.

दूरदर्शनवरील जुन्या मालिकांमध्ये मुंगेरीलाल के हसीन सपने ही मालिका फार लोकप्रिय होती. दिवसा उजेडी स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीच्या कल्पना त्यात रंगवलेल्या होत्या. तेव्हापासून अशी स्वप्न पाहणाऱ्यांना मुंगेरीलाल के हसीन सपने.. असं म्हटलं जातं. अब्दुल सत्तार यांनीही विरोधकांच्या भाकितांसाठी हाच शब्दप्रयोग केला.

ते म्हणाले, ‘ सरकारची अजून अडीच वर्ष आहेत. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताने सरकार येते. निवडणुका होतील तेव्हा 40 चे 80 होतील. एकही आमदार कमी होणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत आहेत.

अजित दादा जयंत पाटील निराशेपोटी बोलत आहेत. त्यांनी सत्तेत स्वतःचा शुद्ध उपयोग आणि दुसऱ्यांचा दुरुपयोग केला. सामान्य माणूस मुख्यमंत्री झाल्यानंतर खानदानी सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या राजकारण्यांना त्रास होतो. अशी टीका कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे…

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनानंतर सरकार कोसळणार असल्याचं भाकित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलंय. तर अजित पवार यांनीही आकड्यांचं गणित मांडून सरकार कोसळू शकतं, असं वक्तव्य केलंय.

एकनाथ शिंदे सरकारमधील काहीजण नाराज आहेत. हा आकडा145 पर्यंत घसरला तर सरकार कोसळेल, असं अजित पवार म्हणालेत. यावर शिंदे सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. 1995मध्ये शरद पवार यांनीदेखील सरकार पडणार पडणार अशी भाकितं केली होती. पण पाच वर्ष मनोहर जोशी आणि राणेंच्या सरकारला धक्का लागला नाही.. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते शिंदे गट आणि भाजपात जाऊ नये, यासाठीच अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केलंय .