अमरावतीः कृषीमंत्री (Agriculture ministers) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात सत्तार स्टाइल टोलेबाजी करणाऱ्या या मंत्र्याची सध्या मेळघाटातही चर्चा आहे. कारणही तसंच घडलंय. अब्दुल सत्तार यांनी बुधवारी रात्री एका शेतकऱ्याच्या (Farmers) घरी अगदी साधेपणाने मुक्काम केला. तिथेच जेवणही केलं. पण रात्रीच्या वेळी पावसाच्या पाण्याने हे घर गळत होते. शेतकऱ्याच्या घराची अशी अवस्था त्यांना पहावली नाही. सत्तारांनी तत्काळ… माझ्याकडून या दोन्ही शेतकऱ्यांना चांगली घरं बांधून मिळतील, असं आश्वासन दिलं. बोले तैसा चाले…. या उक्तीप्रमाणे गुरुवारी सकाळी लगेच जमिनीचं मोजमाप सुरु झालं आणि त्याचं भूमीपूजन करणार असल्याचंही सत्तारांनी जाहीर केलं.. त्यामुळे मेळघाटात कृषीमंत्र्यांच्या दौऱ्याची सध्या चांगलीच हवा झालीय..
मेळघाटमधील साद्राबाडी गावातील चुन्नीलाल पटेल यांच्या घरी अब्दुल सत्तारांनी येथेच्छ पाहुणचार घेतला. तर सुनील धांडे यांच्या घरी मुक्काम केला. शैलेंद्र सावलकर यांच्याही घरी त्यांनी भेट दिली. सुनील धांडे आणि शैलेंद्र सावलकर यांची घरं रात्री गळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना माझ्याकडून घरं बांधून देणार, असं आश्वासन सत्तारांनी दिलं. आज त्याचं भूमीपूजनही होणार आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नाला देखील येणार असल्याचं सत्तारांनी सांगितलं.
शेतकऱ्यांचे दुःख त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या योजने अंतर्गत कृषीमंत्र्यांचा दौरा सुरु आहे. बुधवारी रात्री ते अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाटमधील साद्राबाडी या गावात पोहोचले. येथील चुन्नीलाल पटेल यांच्या घरी त्यांनी अत्यंत साधेपणाने रानभाजी आणि भाकरीचा आस्वाद लुटला. सत्तारांच्या या साध्या पाहुणचाराचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
अब्दुल सत्तार हे आज अमरावती जिल्ह्यात 10 शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा करणार शुभारंभ करणार आहेत. मेळघाटातील साद्राबाडी गावात रात्रीच अब्दुल सत्तार मुक्कामी आले. बांधावरच्या शेतकऱ्यांनी संवाद साधला. गुरुवारी पहाटेच त्यांनी शेतकऱ्यांची दिनचर्या कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी गावात फेरफटका मारला. शेतकरी बांधवांनी सोबत चर्चा करून शेतीविषयक अडचणी, आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती जाणून घेतली. मेळघाटातील इतर गांवांमध्येही ते दौरे करत आहेत.