सातारा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न (Maharashtra Karnataka Border Issue) सध्या ऐरणीवर आहे. या सगळ्या वादावर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कर्नाटक सीमावाद जर लवकर थांबवला नाही तर छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात जाणार आहेत. मी देखील छत्रपती संभाजीराजेंसोबत कर्नाटकात जाणार आहे. तिथं जाऊन आंदोलन करणार आहे”, असं अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) म्हणालेत.
महाराष्ट्रात आणि देशात घाणेरड्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे, असं म्हणत अभिजीत बिचुकले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात केंद्रात एकाच पक्षाच सरकार आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागावा, असंही बिचुकले म्हणालेत.
उदयनराजेंची ओळख शिवछत्रपतींचे वंशज म्हणूनच आहे. त्यांचं स्वतःचं असं काही कार्य नाही, असं म्हणत बिचुकले यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे.
भाजपमधल्या काही लोकांना पंतप्रधानांचं स्वप्न पडलं असून ते आता मोदींना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा मोदींना सल्ला काळजी घ्या, असं म्हणत बिचुकले यांनी पंतप्रधान मोदींना काळजीचा सल्ला दिलाय.
राज्यातील आणि देशातील विकृत मनोवृत्तीची लोक जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरत आहेत.मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही ही असली वक्तव्य खपवून घेणार नाही, असं बिचुकले म्हणालेत.
अभिजीत बीचुकले यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांना दानवा म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर आणि रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मी स्वतः व्यक्तिगत जाब विचारणार आहे. येत्या दोन दिवसात मी रस्त्यावर उतरत त्यांना जाब विचारणार आहे, असं बिचुकलेंनी म्हटलं आहे.