मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या अभिजीत बिचुकले यांची संपत्ती (Abhijit Bichukale Property) समोर आली आहे. ‘बिग बॉस’च्या घरात आपल्या श्रीमंतीचा तोरा मिरवणाऱ्या बिचुकलेंची संपत्ती कोट्यवधींच्या घरात असेल, असा प्रेक्षकांचा कयास होता. मात्र बिचुकलेंनी जाहीर केल्यानुसार ही संपत्ती केवळ हजारांच्या घरात असल्याचं समोर आलं आहे.
अभिजीत बिचुकले यांनी आपली एकूण संपत्ती 78 हजार 503 रुपयेअसल्याचं निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी अलंकृता यांच्या नावावर बिचुकलेंच्या चौपट संपत्ती असल्याचं दिसत आहे. अलंकृता बिचुकले यांच्या नावावर तीन लाख 66 हजार 818 रुपये असल्याचं बिचुकलेंनी सांगितलं आहे.
बिचुकले यांनी आपल्याकडे दागिने, गाडी, पॉलिसी असं काहीही नसल्याचं म्हटलं आहे. 75 हजारांची रोख रक्कम आपल्याकडे असून तीन बँकांमध्ये 3 हजार 503 रुपये असल्याचा दावा बिचुकलेंनी (Abhijit Bichukale Property) केला आहे.
पत्नी अलंकृता यांच्याकडे 40 हजार रुपये रोख रक्कम, बँक खात्यांमधील रक्कम, पॉलिसी, दुचाकी, सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण 3 लाख 66 हजार 818 रुपयांची मालमत्ता आहे. अलंकृता यांच्या नावावर असलेल्या दुचाकीची किंमत 80 हजार, तर 90 हजार किंमतीचे तीन तोळे सोने आहे.
अभिजीत बिचुकलेंना निवडणूक आयोगाची नोटीस, उमेदवारीवर टांगती तलवार
दरम्यान, बिचुकलेंसह वरळी मतदारसंघातील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. त्यामुळे बिचुकलेंच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.
लोकप्रतिनिधित्व अधिनियमा अंतर्गत अभिजीत बिचुकले, विश्राम पाडम आणि महेश खांडेकर या तिघा उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांनी निश्चित केलेल्या दैनिक खर्च नोंदवह्या तपासणीसाठी सादर केल्या नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटिशीला उमेदवारांनी वेळेत उत्तर दिलं नाही, तर त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार आयोगाला असतो.
कोण आहे अभिजीत बिचुकले ?
आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वरळी मतदारसंघाकडे लागलं आहे. ‘बिग बॉस’मुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले बिचुकलेही या मतदारसंघातून नशीब आजमावत असल्याने अनेकांच्या नजरा वळल्या आहेत.
आदित्य यांच्या विरोधात वरळी मतदारसंघामधून मनसेने उमेदवार दिलेला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अॅड. सुरेश माने यांना तिकीट दिलं आहे.
संबंधित बातम्या
शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करेन : अभिजित बिचुकले